अशोक सूटा यंदाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी

माहिती-तंत्रज्ञान जगतातील निपुणतेचा गुणगौरव सोहळा ‘एक्स्प्रेस आयटी अ‍ॅवार्ड’चे शुक्रवारी देशाची तंत्रज्ञान राजधानीत आयोजन करण्यात आले आहे.  केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल.

यंदाचे ‘एक्स्प्रेस आयटी’ पुरस्कारांचे चौथे वर्ष असून, तब्बल ४०० हून अधिक दाखल झालेल्या विक्रमी प्रवेशिकांतून अंतिम पुरस्कारार्थीची निवड केली जाणार आहे. यासाठी गुगल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन, इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन, फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक उमंग बेदी, याहू इंडियाचे माजी संशोधन व विकास अधिकारी व आयस्पिर्टचे संस्थापक शरद शर्मा, नासकॉमच्या उत्पादन परिषदेचे अध्यक्ष रवी गुरूराज आणि आयआयटी बंगळुरूचे संचालक एस. सद्गोपन यांचे तज्ज्ञ परीक्षक मंडळ स्थापण्यात आले असून, प्राइसवॉटरहाऊस कूपर्स त्यांना याकामी सहकार्य करीत आहे.

विप्रोचे माजी मुख्य कार्यकारी आणि माइंडट्री तसेच हॅप्पीएस्ट माइंड्स या कंपन्यांचे संस्थापक अशोक सूटा यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन या सोहळ्यात सन्मानित केले जाईल. वयाच्या ७४ व्या वर्षीही तितक्याच धडाडीने कार्यरत सूटा हे अनेक तरुण आयटी व्यावसायिकांसाठी प्रेरणास्थान आहेत. तर वर्षांतील सर्वाधिक प्रसिद्धीझोत मिळविलेले व्यावसायिकाचा पुरस्कार ‘हाइक’चे कवीन मित्तल यांनी पटकावला आहे. त्यांनी विकसित केलेल्या मेसेजिंग अ‍ॅपने अल्पावधीत १० कोटींहून अधिक वापरकर्ते आणि गुंतवणूकदारांचे दमदार पाठबळही मिळविले आहे.

गतवर्षांप्रमाणे यंदाही नव्या दमाच्या स्टार्ट-अप्स या वर्गवारीतून पुरस्कार इच्छुकांच्या सर्वाधिक जवळपास १०० प्रवेशिका आल्या आहेत. त्यात शिओमी, सिम्प्लीलर्न आणि झूमकार या स्पर्धकांचा समावेश आहे. मोबिलिटी या वर्गवारीतून पुरस्कारासाठी तर ५० नवागत कंपन्यांसह फ्रेशडेस्क, ओला आणि पेटीएमसारख्या प्रस्थापित कंपन्यांतही स्पर्धा आहे. अ‍ॅनालिटिक्स वर्गवारीच्या पुरस्कारासाठीही अ‍ॅडोबे, झोहो आणि टीसीएस यांची आयबीएम, मायक्रोसॉफ्ट यांच्याशी चढाओढ आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिफकार्ट, अ‍ॅमेझॉन, उबर असे सर्व नामांकितांची पुरस्कारांची झुंज लागली आहे.