‘जिओ जी भरके’ म्हणण्याचा मोह झुकरबर्ग यांच्या फेसबुकलाही आवरता आला नाही. रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्म्समधील ९.९९ टक्के हिस्सा फेसबुकने ५.७० अब्ज डॉलर मोजून खरेदी केला आहे.

बुधवारी भांडवली बाजारातील व्यवहार सुरू होण्यापूर्वी जाहीर या भागीदारीची दखल प्रत्यक्षात येथील भांडवली बाजारातही घेतली गेली. प्रति डॉलर ७० रुपये या दराने झालेल्या (४३,५७४ कोटी रुपये) या व्यवहारामुळे आघाडीच्या दोन समाजमाध्यमांना एकमेकांच्या मजकूर तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करता येणार आहे.

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सवर ४०,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. फेसबुकच्या वित्तीय सहकार्यामुळे रिलायन्सला मार्च २०२१ पर्यंत कर्जमुक्त समूह होता येईल. जिओ प्लॅटफॉर्म्सचे मूल्य ४.६२ लाख कोटी रुपयांमध्ये (६६ अब्ज डॉलर) गणले जाते.

ऑक्टोबर २०१९ मध्ये अस्तित्वात आलेल्या रिलायन्सच्या उपकंपनीचे ३८.८० कोटी ग्राहक आहेत. तर भारतात फेसबुकच्या मालकीचे ४० कोटी व्हाट्स अ‍ॅप वापरकर्ते आहेत. रिलायन्स जिओ प्लॅटफॉंम्र्स आणि फेसबुकमधील ऐतिहासिक व्यवहार बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले यांच्या पुढाकाराने पूर्ण झाला. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील ही सर्वात मोठी थेट विदेशी गुंतवणूक मानली जाते. तर यामार्फत फेसबुकचा २०१४ नंतरचा  सर्वात मोठा हिस्सा खरेदी व्यवहार ठरला आहे.

रिलायन्स समभागाचा मूल्यफेर

जिओ प्लॅटफॉर्म्समधील फेसबुकच्या जवळपास १० टक्के हिस्सा खरेदीने मुख्य प्र्वतक रिलायन्स समूहाच्या समभागाने बुधवारी तेजीचा मूल्यफेर धरला. रिलायन्सचा समभाग सत्रा दरम्यान १२ टक्क्य़ांनी झेपावला. तर सत्रअखेर तो १०.३० टक्के वाढीसह १,३६३.३५ वर पोहोचला. परिणामी, रिलायन्सचे बाजार भांडवल एकाच दिवसात ८०,७१०.७० कोटी रुपयांनी झेपावत ८.६४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जवळपास २.५० टक्के वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये रिलायन्सचा सिंहाचा वाटा ठरला.