सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँकेने आपला शंभरावा वाढदिवस नुकताच साजरा केला. ११ नोव्हेंबर १९१९ला स्थापित या बँकेच्या शताब्दी सभारंभाचे उद्घाटन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या  दूर-प्रक्षेपित भाषणाने झाले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस, अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ल आणि आर्थिक सेवा विभागाच्या सचिव दक्षिता दास यांचीही उपस्थिती होती.

यूनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजकिरण रैजी व्यासपीठावर उपस्थित होते. या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘विश्वासाची शंभर वर्षे’ या शीर्षकाच्या कॉफीटेबल ग्रंथाचे अनावरण करण्यात आले. तसेच युनियन बँकेने दोन नवीन प्रकारची कार्डे – कॉम्बो कार्ड (डेबिट व क्रेडिट) आणि रुपे संपर्करहित कार्ड (डेबिट व प्रीपेड) तसेच ‘यू मोबाइल’ हे नवीन मोबाइल अ‍ॅप, त्याचप्रमाणे सूक्ष्म-लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगक्षेत्रातील कर्जविस्तारासाठी नवीन वेब व टॅब आधारित मॉडय़ूल ‘यूनियन मुद्रा’ आदी सुविधांची या निमित्ताने सुरुवात केली.