गेल्या सलग १८ महिन्यांत अनुभवास आला नाही, इतका म्हणजे ५ टक्क्य़ांच्या दराने सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात देशातील औद्योगिक उत्पादनाने वाढीचा दर दाखविला. उल्लेखनीय म्हणजे निर्माण क्षेत्रात दिसलेले चैतन्य आणि ग्राहकोपयोगी उत्पादनात वाढीचा परिणाम म्हणून ही वाढ शक्य झाली आहे; तथापि गेल्या वर्षी याच महिन्यात तळाला पोहोचलेल्या उत्पादन दराशी तुलना करून ही आकडेवारी प्रस्तुत झाली असल्याने यंदाची ही वाढ लक्षणीय मोठी दिसून येत आहे; परंतु तरीही विविध विश्लेषक जसे कयास करीत होते त्यापेक्षा प्रत्यक्षात जाहीर झालेल्या उत्पादन दराचे प्रमाण खूपच अधिक मात्र आहे.
सरकारने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीत सर्वात दिलासादायी बाब म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन घेणाऱ्या निर्माण क्षेत्राने फेब्रुवारीत ५.२ टक्क्य़ांनी (जानेवारीत हा दर ३.३ टक्के होता) उसळी घेतली आहे, तर जानेवारीत उणे ०.१ नॉन डय़ुरेबल ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनाने फेब्रुवारी १० टक्क्य़ांचा विकास साधला. ग्राहकोपयोगी उत्पादनाच्या निर्मितीने उणे ३.४ टक्क्य़ांचा दर दाखविला असला तरीही जानेवारीच्या तुलनेत तो सुधारलाच आहे. जानेवारीत तो नकारार्थी ५.२ टक्क्य़ांच्या स्तरावर होता.
लक्षणीय म्हणजे खाण क्षेत्र आणि वीजनिर्मिती क्षेत्रानेही फेब्रुवारीत अनुक्रमे २.५ टक्के आणि ५.९ टक्के अशी सकारात्मक वाढ दाखविली आहे. या महिन्यातील एकूण उंचावलेल्या कामगिरीमुळे, एप्रिल २०१४ ते फेब्रुवारी २०१५ अशा ११ महिन्यांसाठी एकत्रित औद्योगिक उत्पादन दर २.८ टक्के असा सुधारला आहे.

गत १८ महिन्यांतील उच्चांकी स्तर
मरगळ झटकून उभारीच्या उंबरठय़ावर आपण पोहोचलो आहोत. नोव्हेंबरपासून सलग सकारात्मक वाढीनंतर फेब्रुवारीतील औद्योगिक उत्पादन दराने लक्षणीय उसळी दर्शविली. मार्च महिना एरव्ही चांगला राहत असल्याने तोही वाढीचाच राहील; पण खरी कसोटी एप्रिल महिन्यातील दराची असेल. एप्रिलमध्ये २ ते ३ टक्क्य़ांची वाढ दिसल्यास, या आघाडीवरील चिंता संपूर्ण सरल्याचे ठामपणे म्हणता येईल.
-डॉ. सौम्य कांती घोष, मुख्य आर्थिक सल्लागार, स्टेट बँक

आर्थिक उभारीची सुचिन्हे
देशातील कारखान्यांची उपज मापनाचे परिमाण असलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी)ने सरलेल्या फेब्रुवारीअखेर ५ टक्क्य़ांची मजल मारून, खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला उभारीला सुरुवात झाल्याचे संकेत दिले. जानेवारी २०१५ मध्ये हाच दर २.६ टक्के होता, त्याने महिनाभरात दुपटीने उसळी मारणे हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उत्साहवर्धक चिन्ह आहे. दुसरीकडे देशांतर्गत ग्राहकांचे मनोबल उंचावले असल्याचे कार विक्रीच्या वार्षिक ५ टक्क्य़ांच्या वाढीने दर्शविले आहे. कार विक्रीने आधीच्या सलग दोन वर्षांतील घसरणीला झटकले, तर कारखानदारीच्या दराने १८ महिन्यांतील उच्चांकी स्तर पुन्हा मिळविला आहे.