सरकारकडूनच राज्यसभेत कबुली
देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे ४०० कोटी रुपये मूल्याच्या खोटय़ा नोटा चलनात असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारनेच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोलकात्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेद्वारे खोटय़ा भारतीय चलनी नोटांच्या मुद्दय़ावर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार ही माहिती समोर आल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले. राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. चलनात असलेल्या खोटय़ा भारतीय चलनी नोटांचे मूल्य ४०० कोटी रुपये असल्याचे मेघवाल यांनी सांगितले. खोटय़ा नोटय़ांचे मूल्य गेल्या चार वर्षांपासून याच समकक्ष राहिले असल्याचेही ते म्हणाले. खोटय़ा चलनी नोटा रोखण्यासाठी अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय, रिझव्‍‌र्ह बँक तसेच केंद्र आणि राज्यांच्या तपास संस्था उपाययोजना करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृह खात्याच्या अंतर्गत खोटय़ा भारतीय चलनी नोटांना पायबंद घालण्याबाबत सहकार्य गट स्थापन करण्यात आला असून केंद्र तसेच राज्यातील विविध तपास संस्थांबरोबर माहितीचे आदान-प्रदान होत असल्याचेही ते म्हणाले.