14 October 2019

News Flash

सुवर्ण मागणीला बळकटी ; किमती घसरल्याने पहिल्या तिमाहीत ५ टक्के अधिक मागणी

जागतिक सुवर्ण परिषदेने २०१९ च्या पहिल्या तिमाहीतील सोने मागणी कल गुरुवारी स्पष्ट केला.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : किमतीतील घसरण, लग्नसराईचा हंगाम यामुळे भारताकडून असलेली सोन्याची मागणी मार्च २०१९ अखेरच्या तिमाहीत ५ टक्क्यांनी वाढली आहे. यंदाच्या जानेवारी ते मार्चदरम्यान १५९ टन मौल्यवान धातूची मागणी नोंदली गेली आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेने २०१९ च्या पहिल्या तिमाहीतील सोने मागणी कल गुरुवारी स्पष्ट केला. डॉलरच्या तुलनेतील भक्कम रुपया, मौल्यवान धातूच्या दरातील घसरण, स्थानिक पातळीवर असलेले लग्नादीचे मुहूर्त यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे.

जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान भारताने १५१.५० टन सोने मागणी नोंदविली होती. मूल्याबाबत यंदाच्या पहिल्या तिमाहीत सोन्याची मागणी १३ टक्क्यांनी वाढून ४७,०१० कोटी रुपये झाली आहे.

मौल्यवान धातूच्या दागिन्यांसाठी असलेली मागणी ५ टक्क्यांनी वाढून १२५.४० टनवर गेली आहे. पहिल्या तिमाहीत लग्नाचे २१ मुहूर्त होते. तुलनेत वर्षभरापूर्वी ते या दरम्यान अवघे ८ होते.

मूल्याबाबत दागिन्यांची मागणी १३ टक्क्यांनी वाढून पहिल्या तिमाहीत ती ३७,०७० कोटी रुपये झाली आहे. तर गुंतवणूक म्हणून ती ४ टक्क्यांनी वाढत ३३.६० टन नोंदली गेली आहे.

मूल्याबाबतच सोने गुंतवणूक मागणी १२ टक्क्यांनी विस्तारत ९,९४० कोटी नोंदली गेली आहे. पुनर्वापर केलेल्या सोन्याचे प्रमाण १४ टक्क्यांची भर पडून १६.१० टन झाले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेने सोने मागणीच्या दिलेल्या दाखला कालावधीत भारतात सोन्याची किंमत १० ग्रॅमकरिता ३२,००० रुपयांच्या आत राहिली आहे.

चोरटय़ा मार्गाने होणाऱ्या मौल्यवान धातूच्या आयातीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करत जागतिक सुवर्ण परिषदेच्या भारत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी सोन्यावरील आयात शुल्कात कपातीकरिता आग्रह धरला आहे.

जागतिक मागणीतही वाढ

जागतिक स्तरावर मौल्यवान धातूची मागणी ७ टक्क्यांनी वाढली आहे. २०१९ च्या पहिल्या तिमाहीत ती १,०५३.३० टन नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत सोन्याची मागणी ९८४.२० टन होती, जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यान सोन्यातील धातूरूपातील गुंतवणूक मात्र अवघ्या ३ टक्क्य़ांनी वाढली आहे

श्रीमंत भारतीयांच्या एकंदर गुंतवणुकीत सोन्याचा वाटा वधारणार  – नाइट फ्रँक अहवाल

मुंबई : देशातील १४ टक्के अतिउच्च संपदा असलेल्या व्यक्तींचा कल सोन्याच्या गुंतवणुकीत वाढीकडे असल्याचे ‘नाइट फ्रँक’ने केलेल्या गुंतवणूक दृष्टिकोनविषयक सव्रेक्षणाचा निष्कर्ष आहे. आधीच या वर्गाचा सोन्याच्या गुंतवणुकीतील वाटा हा जागतिक सरासरी २ टक्के सरासरीच्या दुप्पट म्हणजे ४ टक्के इतका असून, त्यात २०१८ सालच्या तुलनेत जवळपास ३ टक्के वाढ होईल, असा या अहवालाचा कयास आहे.

जगभरात सोन्याच्या गुंतवणुकीतील कल वाढला आहे असे हे सर्वेक्षण सांगते. पाहणीत भाग घेतलेल्यांपैकी २० टक्के लोकांनी २०१९ मध्ये सोन्यातील गुंतवणूक वाढवणार असल्याचे सांगितले आहे. २०१८ सालातील पाहणीत असा कल दर्शविणाऱ्या मंडळींचे प्रमाण ११ टक्के इतके होते. तर यंदा आशियातील उच्च धनसंपदा वर्गासाठी असा सकारात्मक कल असणाऱ्यांचे प्रमाण तर २५ टक्के इतके आहे. चीनमधील धनवानांच्या बाबतीत हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे.

लग्नसराई, उर्वरित पारंपरिक खरेदीचे मुहूर्त, यंदा अपेक्षित असलेला सरासरीपेक्षा चांगले पाऊसपाणी तसेच दसरा-दिवाळीसारखा सण यामुळे एकूण २०१९ मध्ये देशाची सोने मागणी ७५० ते ८५० टन नोंदली जाण्याची शक्यता आहे.

’ पी. आर. सोमसुंदरम,व्यवस्थापकीय संचालक, जागतिक सुवर्ण परिषद

First Published on May 3, 2019 1:17 am

Web Title: fall in gold prices increase 5 percent more demand in the first quarter