जागतिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरत्या तेलाच्या किमतीचा फटका भारताच्या निर्यातीला बसला असून जूनमधील निर्यात १५.८२ टक्क्य़ांनी रोडावली आहे. डिसेंबरपासून सलग सातव्या महिन्यात झालेली ही निर्यातीतील घसरण असून, जूनमध्ये ती अवघी २२.२८ अब्ज डॉलर नोंदली गेली.
वर्षभरापूवी, जून २०१४ मध्ये निर्यात २६.४७ अब्ज डॉलर होती. यापूर्वी नोव्हेंबर २०१४ मध्ये निर्यातीत ७.२७ टक्क्य़ांची वाढ नोंदली गेली होती. यंदा देशातील पेट्रोलियम पदार्थ (५३ टक्के), अभियांत्रिकी वस्तू (५.५ टक्के), चामडय़ाच्या वस्तू (५ टक्के), रसायने (१.२६ टक्के) यांना जागतिक बाजारपेठेत कमी मागणी राहिल्याने प्रामुख्याने निर्यात घसरली आहे.
भारतावरील सोने व तेल आयातीचा भार काहीसा हलका झाला असून परिणामी जूनमध्ये आयात १३.४० टक्क्य़ांनी कमी होत ती ३३.११ अब्ज डॉलर राहिली आहे. या जोरावरच जूनमधील व्यापार तूट १०.८२ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. आयात – निर्यातीतील फरक असलेली व्यापार तूट वर्षभरापूर्वी ११.७६ अब्ज डॉलर होती.
त्वरित उपायांची अपेक्षा
मेमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दर तर जून महिन्यातील निर्यातही रोडावल्याने उद्योग, निर्यातदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. अर्थ विकासाच्या या घसरत्या निदर्शकांना पायबंद घालण्यासाठी सरकारकडून त्वरित उपाययोजनांची अपेक्षा उद्योगजगत करीत आहे. मार्च २०१५ मध्ये निर्यात २१ टक्क्य़ांनी खाली आली होती. गेल्या सहा वर्षांतील निर्यातीतील ही सुमार कामगिरी होती.
एप्रिल ते जून या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत निर्यात १६.७५ टक्क्य़ांनी कमी होत ६६.६९ अब्ज डॉलरवर आली आहे. चालू आर्थिक वर्षांसाठी सरकारने ४०० अब्ज डॉलरचे एकूण निर्यात लक्ष्य राखले आहे.
सोने, तेल आयात ओसरली..
सोन्यातील आयात सलग तिसऱ्या महिन्यात घटली आहे. वार्षिक तुलनेत सोने आयात जूनमध्ये ३७ टक्क्य़ांनी कमी होत १.९६ अब्ज डॉलर झाली. त्या उलट रत्ने व दागिन्यांची निर्यात मात्र १८ टक्क्य़ांनी वाढली आहे. तेल आयात ३४.९७ टक्क्य़ांनी कमी होत ८.६७ अब्ज डॉलर राहिली आहे.