खाद्यान्नांच्या किमती उतरल्याने किरकोळ किमतींवर आधारीत महागाई दराने नोव्हेंबरअखेर ४.३८ टक्क्य़ांचा नवीन नीचांक नोंदविला. सलग पाचव्या महिन्यात सुरू राहिलेल्या उतरंडीने रिझव्‍‌र्ह बँकेवर कर्जाच्या व्याजदरात कपातीच्या आर्जवाला आणखीच दुजोरा दिला आहे.
जानेवारी २०१२ पासून सरकारने नव्याने ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारीत महागाई दराचे मापन सुरू केल्यानंतर, महागाई दराने दाखविलेला ४.३८ टक्के हा सर्वात निम्नतम स्तर आहे. आधीच्या महिन्यात म्हणजे ऑक्टोबर २०१४ मध्ये हा दर ५.५२ टक्के, तर गेल्या वर्षी म्हणजे नोव्हेंबर २०१३ मध्ये तो सद्य पातळीच्या दुप्पट म्हणजे ११.१६ टक्के असा होता. उल्लेखनीय म्हणजे सरलेल्या महिन्यात कायम चढय़ा राहिलेल्या अन्नधान्याच्या महागाई दराने ३.१४ टक्क्य़ांवर उसंत घेतली आहे. आधीच्या महिन्यात हा स्तर ५.५९ टक्क्य़ांवर होता.
भाज्यांच्या किरकोळ किमती १०.९ टक्क्य़ांनी घटल्या आहेत, तर फळांच्या किमतीही आधीच्या महिन्यांतील १७.४९ टक्क्य़ांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये १३.७४ टक्क्य़ांनीच वाढल्या आहेत. तथापि प्रथिनेयुक्त आहार जसे अडी, मांस, मासे यांच्या किमती ऑक्टोबरच्या तुलनेत किंचित वाढल्या आहेत.
महागाईकेंद्रीत पतधोरणाची कास धरत रिझव्‍‌र्ह बँकेने जानेवारी २०१५ पर्यंत महागाई दराबाबत ८ टक्क्य़ांचे तर जानेवारी २०१६ मध्ये ६ टक्क्य़ांचे लक्ष्य निर्धारीत केले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांत रिझव्‍‌र्ह बँकेने लक्ष्य केलेल्या पातळीपेक्षा कमी राहिलेल्या महागाई दराने व्याजदर कपातीसाठी सुयोग्य वेळ आल्याचे सुस्पष्ट संकेत दिले आहेत.