सर्जनाच्या क्षेत्रात कार्यरत जागतिक कीर्तीच्या १४ निष्पक्ष जाहिरात संस्थांमध्ये राज कांबळे यांनी स्थापित केलेल्या मुंबईस्थित ‘फेमस इनोव्हेशन्स’ या कंपनीचा समावेश करण्यात आला आहे. ‘द नेटवर्क वन’ने लंडनस्थित कॅम्पेन मॅगेझिनच्या सहयोगाने केलेल्या सर्वेक्षणाअंती २०१६ सालासाठी ही जागतिक अग्रणी संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. रेड ब्रिक रोड (ब्रिटन), द सीक्रेट लिटिल एजन्सी (सिंगापूर) आणि द ज्युपिटर रूम (दक्षिण आफ्रिका) वगैरे अग्रणी कंपन्यांच्या सूचित स्थान मिळविणारी फेमस इनोव्हेशन ही एकमेव भारतीय जाहिरात कंपनी आहे. अलीकडेच कॅम्पेनतर्फे दक्षिण आशियातील वर्षांतील सर्वोत्तम जाहिरात संस्था आणि यंग कान्स लायन यासारखे प्रतिष्ठेचे सन्मान मिळविणाऱ्या फेमस इनोव्हेशनला लाभलेला तिसरा बहुमान आहे. डिसेंबर २०१२ मध्ये सुरुवात करणाऱ्या या कंपनीची सध्या दोन कार्यालये आणि ७५ सर्जनशील मनुष्यबळाचा ताफा आहे.