वृत्तवाहिन्यांमध्ये आणखी परदेशी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा विचार आहे; पण सध्या बातम्यांचा दर्जा फार खालावलेला आहे व पत्रकारांना प्रशिक्षित करण्यात फार थोडी गुंतवणूक केली जाते, असे माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, की वृत्तवाहिन्यांमध्ये जास्त परकीय गुंतवणूक आणण्याचा आमचा विचार आहे. पण विशिष्ट कालमर्यादेत तसे करणे शक्य होईलच असे नाही. पण आमचा तसा विचार सुरू आहे.
प्रसारमाध्यमे व करमणूक उद्योगाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. नियमाप्रमाणे वृत्तवाहिन्यांमध्ये २६ टक्के परदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. दुर्दैवाने वृत्तवाहिन्यांकडे गुंतवणुकीस पैसा नसल्याने पत्रकारांच्या प्रशिक्षणात गुंतवणूक केली जात नाही. त्यांचे प्रश्न, सादर होणाऱ्या बातम्या व आपला विकसिततेकडे वाटचाल करणारा देश या मुद्दय़ांचा विचार करता गुंतवणूक आवश्यक आहे. बातम्यांचा दर्जा सुधारायला हवा व त्यासाठी पत्रकारांच्या प्रशिक्षणात गुंतवणूक गरजेची आहे. खासगी एफएम वाहिन्यांवर बातम्यांना परवानगी देण्याबाबत त्यांनी सांगितले, की बदलत्या काळानुसार धोरणे बदलतील. एके काळी खासगी रेडिओवर बातम्या नव्हत्याच, आता तिसऱ्या विस्तार टप्प्यात ती स्थिती बदलली आहे.