महाराष्ट्रात बुधवार रात्रीपासून लागू झालेल्या १५ दिवसांच्या संचारबंदीचे  अर्थव्यवस्थेवर घातक परिणामाची भीती आघाडीच्या उद्योग संघटनांनी व्यक्त केली आहे. निर्बंधामुळे करोना साथ प्रसाराला आळा बसेल; मात्र वस्तू आणि सेवेचा अपुरा पुरवठा होऊन महागाई वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

या निर्बंधाचा विस्तार ३० एप्रिलनंतर होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करतानाच उद्योग संघटनांच्या प्रमुखांनी, काही व्यवसाय क्षेत्राला विविध सवलती देण्याची मागणीही केली आहे.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात १५ टक्के वाटा असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचा उद्योगधंदे तसेच सेवा क्षेत्रातही सिंहाचा वाटा आहे. केंद्र सरकारला प्राप्त होणाऱ्या एकूण कर महसुलापैकी ३० टक्के योगदाने हे या राज्याचे आहे.

निर्बंधामुळे साथप्रसाराला आळा बसण्याची आशा व्यक्त करतानाच ‘फिक्की’च्या महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्षा सुलज्जा फिरोदिया-मोटवानी यांनी, राज्याच्या अर्थकारणाला कमीत कमी झळ बसण्याच्या दिशेने सरकारशी समन्वय व सहयोगाची तयारी दर्शवली आहे. राज्यातील अधिकतर उत्पादक आपल्या वस्तू महाराष्ट्राबाहेर मोठ्या प्रमाणात विकत असतात; तेव्हा त्यांच्याही पुरवठ्याला  या निर्बंधाने खीळ बसण्याची शक्यता त्यांनी  वर्तवली आहे.

‘सीआयआय’च्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष बी. त्यागराजन यांनी, संचारबंदी दरम्यान उद्योग सुस्थितीत चालवणे आव्हानात्मक असून असल्याचे मत व्यक्त केले. अधिक कठोर निर्बंध टाळून दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्याकडे उद्योगांचा कल असल्याचेही ते म्हणाले.

‘अ‍ॅसोचेम’ने महाराष्ट्रासह अन्य राज्यांनीही असंघटित क्षेत्राला या दरम्यान साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. छोट्या कंपन्यांना वीज देयक, भाडे दर, परवाना शुल्क यात काही कालावधीसाठी सूट देण्याची तिने मागणी  केली आहे. हॉटेल, मॉल या क्षेत्राला मनुष्यबळ तगवून आणि टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक साहाय्य दिले जावे असे तिने म्हटले आहे.

‘रेमडेसिविर’ उत्पादनाला वेग

वाढत्या करोना रुग्णसंख्येपोटी उपचारात उपयुक्त रेमडेसिविर इंजेक्शनच्या तुटवड्याची स्थिती लक्षात घेता, त्याच्या उत्पादनाचा वेग वाढविण्यात येत आहे, अशी ग्वाही आघाडीच्या औषधी कंपन्यांनी बुधवारी दिली.

रेमडेसिविरचा सध्याचा तुटवडा लक्षात घेऊन सरकारने या इंजेक्शनच्या निर्यातीवर नुकतीच बंदी आणली आहे. सध्या देशभरातील विविध सात कंपन्या हे औषध तयार करतात. देशाची महिन्याला ३८.८० लाख रेमडेसिविर निर्मिती क्षमता आहे.

पहिली लाटेतील उपलब्धतेच्या तुलनेत रेमडेसिविरचे उत्पादन सध्या दुप्पट करण्यात आल्याचे ‘सिप्ला’ने म्हटले आहे. झायडस कॅडिलाच्या तीन प्रकल्पातून यापूर्वी ५ ते ६ लाख कुप्या ही रेमडिसिविरची उत्पादन क्षमता महिन्याभरातच १० ते १२ लाखांवर गेली आहे; ती आणखी महिन्याभरात दुप्पट करण्यात येईल, असे या कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. डॉ. रेड्डीज् लॅबच्या म्हणण्यानुसार, इंजेक्शनच्या उत्पादनात वाढीसह त्याची किंमतही ५० टक्क्यांनी कमी होऊन निम्म्यावर येईल, असा प्रयत्न आहे. रेमडेसिविरची मागणी पूर्ण करण्याकरिता ‘सिन्जेन’बरोबर सहकार्य करीत असल्याचे सन फार्माने स्पष्ट केले. या कंपनीच्या दोन औषधनिर्मिती प्रकल्पाला आता आणखी एका उत्पादन केंद्राची जोड मिळणार आहे.

अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राखण्याची कंपन्याकडून ग्वाही

मुंबई : महाराष्ट्रात बुधवार रात्रीपासून लागू संचारबंदीमुळे अत्यावश्यक वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता असून त्यांचा पुरवठा सुरळीत राखला जाईल, असे आघाडीच्या कंपन्यांनी म्हटले आहे.

मागील टाळेबंदीतून आम्हाला नेमक्या समस्या काय व त्याचे निराकरण कसे करायचे हे उमगले असून यंदा तुलनेत योग्य नियोजनाद्वारे अत्यावश्यक वस्तूंचा योग्य रीतीने पुरवठा करण्यावर भर देण्यात येईल, असे आयटीसी, पार्ले प्रॉडक्ट्स, मॅरिको, इमामी, हिंदुस्थान यूनिलिव्हर, पी अँड जी, नेस्ले, ब्रिटानिया आदी कंपन्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत. परिणामी अत्यावश्यक वस्तूंची गरज येत्या काही दिवसांमध्ये वाढणार आहे. १५ दिवसांच्या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा तसेच वस्तूंच्या पुरवठ्याला वगळण्यात आले आहे.

ई-कॉमर्स संकेतस्थळांवरून मर्यादित विक्रीच!

महाराष्ट्रात संचारबंदी दरम्यान केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच विक्री करण्याची परवानगी असल्याचे अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. या संकेतस्थळावरून अन्य वस्तूंच्या खरेदीची सुविधा उपलब्ध नसेल. परिणामी या संकेतस्थळावर तयार कपडे, विद्युत उपकरणे आदींची खरेदी करताना महाराष्ट्रातील इच्छित शहराचा पिन कोड टाकल्यानंतर ‘ही सुविधा उपलब्ध नसल्या’चा मजकूर झळकतो.