अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारत असल्याने उपाययोजना माघारी घेण्याची शक्यता बळावल्याचे चित्र शेअर बाजारात पहायला मिळाले. आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनची भांडवली बाजारातील नकारात्मक वाटचाल सप्ताहअखेरही कायम राहिली. सलग चौथ्या सत्रात मुंबई निर्देशांकाने घसरण नोंदविली. शुक्रवारी १५७६.६२ अंश आपटीसह सेन्सेक्स २०,६६६.१५ पर्यंत खाली आला. त्यामुळे प्रमुख भांडवली बाजाराने दोन आठवडय़ातील तळ गाठला आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्था सुधारत असल्याने रोखे खरेदी मुदतीपूर्व आटोपती घेण्याची शक्यता भारताच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही यापूर्वी व्यक्त केली आहे.
मुंबई शेअर बाजारात आज ग्राहकपयोगी वस्तू, बँक, तेल व वायू क्षेत्रातील समभागांची विक्री तर भांडवली वस्तू, बांधकाम क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. आठवडय़ाच्या सुरुवातीला विक्रमी टप्प्यावर असलेल्या सेन्सेक्सने सप्ताहअखेरीस गेल्या पाच दिवसातील सर्वात मोठी आपटी नोंदविली.

डॉलरच्या पुढे रुपया शुक्रवारी ६३ च्या नजीक प्रवास करता झाला. सप्ताहअखेरच्या व्यवहारात चलनात ६ पैशांची घट होत रुपया ६२.४७ वर स्थिरावला. सलग चौथ्या दिवशी चलन कमकुवत होताना रुपयाने आता गेल्या सहा आठवडय़ाचा नीचांक राखला आहे. अमेरिकेच्या सुधारणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे पाहून विदेशी चलनाला मागणी वाढली आहे.