अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या रोखे खरेदी आटोपती घेण्याच्या अपेक्षित निर्णयाला प्रतिसाद देण्याचे भांडवली बाजाराचे धोरण सप्ताहअखेर अधिक उंचावले. गुरुवारच्या व्यवहारात २१ हजाराला स्पर्श करून माघारी फिरणाऱ्या सेन्सेक्सने शुक्रवारी मात्र याच टप्प्याला पुन्हा गाठत एकाच सत्रात तब्बल ३७१ अंशांची झेप घेतली.
सेन्सेक्स ३७१.१० अंश वाढीसह २१,०७९.७२ वर निफ्टी १०७.६० अंश वधारणेसह ६,२७४.२५ पर्यंत पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांची रक्कमही एक लाख कोटी रुपयांनी वधारली.
कालच्या व्यवहारातील २१ हजाराच्या वरच बाजार शुक्रवारी खुला झाला. सेन्सेक्स व्यवहारात २१,११७.९९ पर्यंत गेला. दिवसअखेर मुंबई निर्देशांकाची तीन शतकांची उडी ही महिन्यातील सर्वोत्तम ठरली. तत्पूर्वी २५ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्सने एकाच व्यवहारात ३८८ अंश वाढीची नोंद केली होती. फेडरल रिझव्र्हबाबत समस्त स्तरावर िंचंता व्यक्त होत नसल्याचा हा परिणाम आहे.
खासगी तेल व वायू कंपनी रिलायन्सलाही दुप्पट दराने वायूविक्रीची परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या गुरुवारच्या उशिराच्या निर्णयाने कंपनी समभाग शुक्रवारी तब्बल ४.५८ टक्क्यांनी उंचावला. त्याच्यासह ओएनजीसीनेही सेन्सेक्सला २१ हजारांपर्यंत नेण्यास हातभार लावला. १३ क्षेत्रीय निर्देशांकातही याच निर्देशांकाची आगेकूच राहिली. सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २७ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले.
प्रमुख भांडवली बाजाराने गुरुवारी फेड निर्णयानंतर दिडशे अंशांची घसरण नोंदविली होती; मात्र शुक्रवारअखेरनंतर मुंबई निर्देशांकाची गेल्या आठवडय़ाच्या तुलनेतील वाढ ३६४ अंशांची राहिली आहे.
तेल व वायू समभागांमध्ये मूल्य वधारणीचे इंधन
रिलायन्सला दुप्पट दराने वायूविक्रीस परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय भांडवली बाजाराच्या या क्षेत्रातील कंपनी समभागांच्या पथ्यावर पडला. सेन्सेक्समध्ये (३० कंपनी समभागांमध्ये) ८० टक्के हिस्सा राखणाऱ्या खुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग ५ टक्क्यांनी उंचावत ८९३.६५ रुपयांवर गेलाच. मात्र सेन्सेक्स व निफ्टीच्या दरबारीही तो सर्वोच्च स्थानावर होता. ओएनजीसीचा समभागही ४ टक्क्यांनी वधारला.
रुपया उंचावला
भारतीय चलनात गेल्या सलग तीन सत्रांपासून सुरू असलेली घसरण सप्ताहाअखेर मंदावली. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी १० पैशांनी उंचावत ६२.०४ वर पोहोचला. गेल्यात तीनही व्यवहारांत चलनावर दबाव निर्माण झाला होता. भांडवली बाजाराप्रमाणेच परकी चलन व्यासपीठानेही अमेरिकन फेडरल रिझव्र्हच्या निर्णयातून उसासा टाकला. सप्ताहारंभी ६१.७३ च्या वरच्या टप्प्यावर असणारा रुपया गेल्या तीन सत्रांत ४१ पैशांनी घसरला आहे. चलन सप्ताहाअखेरच्या व्यवहारात ६२.०१ पर्यंत उंचावले होते. तर त्याचा दिवसातला तळ ६२.४५ रुपये होता.
“फेडच्या आवरत्या धोरणानंतर भांडवली बाजार सकारात्मक वाटचाल करत आहे. तेल व वायू निर्देशांकातही तेजी नोंदविली गेली आहे. अमेरिकेच्या निर्णयानंतरही शेअर बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची खरेदी कायम आहे.”
जिग्नेश चौधरी, वेरासिटी ब्रोकिंग सव्र्हिसेसचे संशोधकप्रमुख.

दुष्काळाने वाढला युरिया आयातीचा भार
वाढत्या मागणीपोटी देशाची युरिया आयात चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या आठ महिन्यांमध्ये ६.२० टक्क्यांनी वधारली आहे. रकमेत ती १.६४ अब्ज डॉलरची नोंदविली गेल्याचे खत मंत्रालयाने म्हटले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान आयात ५७.५३ लाख टन राहिली आहे. गेल्या वर्षांतील याच कालावधीत युरिया आयात ५४.१७ लाख टन होती. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थानमध्ये गेल्या वर्षांत उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे रासायनिक खत आयात वाढली आहे. नोव्हेंबर २०१२ च्या १४.०३ लाख टनच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबरमध्ये मात्र आयात कमी झाली असून ती ७.१६ लाख टन राहिली आहे. या दरम्यान डिसेंबर २०१२ मध्ये १५.३५ लाख टन सर्वोच्च तर मार्च २०१३ मध्ये ती १.७९ लाख टन अशी किमान राहिली आहे. यंदाच् युरियाच्या किंमती सरासरी ५० डॉलर प्रति टन कमी झाल्याचे ‘इंडियन पोटॅश लिमिटेड’चे अध्यक्ष पी. एस. गहलोत यांनी सांगितले. शेतकऱ्यांना प्रति टन ५,३६० रुपये सलवत दराने युरिया विकला जातो. २०१२-१३ मध्ये भारताने २.९४ अब्ज डॉलरची ८०.४ लाख टन युरिया आयात केली आहे.