२० हजार ते २२ हजार असा प्रवास पाहणाऱ्या आणि ऐतिहासिक विक्रमांची नोंद अनेक दिवस करणाऱ्या भांडवली बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी सेन्सेक्समधील आघाडीच्या समभागांना आपली पसंती दर्शविली आहे. मुंबई निर्देशांकातील प्रमुख अशा १६ कंपन्यांमध्ये या गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात हिस्सा खरेदी केली आहे. अर्थातच यामध्ये रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसीसारख्या कंपन्या आघाडीवर राहिल्या आहेत.
मुंबई शेअर बाजाराच्या प्रमुख सेन्सेक्समध्ये ३० कंपनी समभागांचा समावेश होतो. पैकी १६ कंपनी समभागांची विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी गेल्या तिमाहीत अधिक खरेदी केली. उलट जानेवारी ते मार्च २०१४ मध्ये त्यांनी १० समभागांमधील गुंतवणूक काढून घेतली. तर आयटीसीतील त्यांची १९.२६ टक्के गुंतवणूक ही स्थिर राहिली आहे. याबाबत मारुती सुझुकी, सिप्ला आणि सेसा स्टरलाइटबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या यंदाच्या धोरणाची तुलना ही आधीच्या, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१३ तिमाहीशी करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २२ हजार कोटी रुपयांचा निधी भांडवली बाजारात ओतला आहे. याच दरम्यान मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ५.५२ टक्क्यांनी वाढून २२,३३९.९७ वर पोहोचला होता.
विदेशी संस्थागतांकडून गुंतवणूक कमी करणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा समूहातील टाटा मोटर्स, टाटा पॉवर, टीसीएससह कोल इंडिया, एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. या गुंतवणूकदारांनी सर्वाधिक समभाग खरेदी ही अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी यांची केली आहे. बँक क्षेत्राला प्राधान्य देताना त्यांनी अॅक्सिस बँकेमधील हिस्सा गेल्या तिमाहीत ५.५६ टक्क्यांनी वाढवत तो ४८.७४ टक्क्यांपर्यंत नेला आहे. पाठोपाठ आयसीआयसीआय बँकेतील हिस्साही १.४६ टक्क्यांनी उंचावत ३९.८७ टक्के केला आहे. एचडीएफसीतील विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे प्रमाण आता १.४६ टक्क्यांनी वाढले असून ते एकूण तब्बल ७५.७१ टक्के झाले आहे.
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी हिस्सा कमी केलेल्या कंपन्यांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील एनटीपीसीचाही समावेश राहिला आहे. येथील त्यांचे प्रमाण ०.९९ टक्क्यांनी कमी होऊन ९.३३ टक्के झाले आहे. तर खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेतील प्रमाण ०.८४ टक्क्यांनी रोडावून ते ३४.०८ टक्के झाले आहे.
सेन्सेक्समधील १६ कंपन्यांमध्ये तिमाहीत भरघोस समभाग खरेदी
५ कंपन्यांची ६ हजार कोटींची पुनर्खरेदी
शेअर बाजारातील पाच कंपन्यांनी त्यांच्या भागधारकांकडून सुमारे ५९४०.८५ हजार कोटी रुपयांची समभागांची पुनर्खरेदी यंदाच्या वर्षांत करण्याचे जाहीर केले आहे. केर्न इंडिया, डीसीएम श्रीराम, इसजेक हेवी इंजिनीअर्स, गुजरात अपोलो इंडस्ट्रीज आणि इंडो बोरॅक्स अॅण्ड केमिकल्स या त्या पाच कंपन्या आहेत. या कंपन्यांनी मिळून एकूण १९ कोटी समभाग हे त्यांच्या भागधारकांकडून खरेदी करण्याचे निश्चित केले आहे.
खुल्या बाजाराच्या माध्यमातून हे व्यवहार होणार असल्याचे सेबीने म्हटले आहे. या पाचही कंपन्यांना जुलैपर्यंत ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. यापूर्वी जानेवारीत पार पाडलेल्या समभाग पुनर्खरेदी योजनेंतर्गत केर्न इंडियाने ५७२५ कोटी रुपये उभारले होते. सेबीने ऑगस्ट २०१३ मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जाहीर केलेल्या समभाग पुनर्खरेदीपैकी निम्मा हिस्सा कंपन्यांना खरेदी करता येतो. तसे न केल्यास वर्षभरात पुन्हा ही प्रक्रिया पार पाडावी लागते. तसेही न घडल्यास २.५ टक्के दंडाची तरतूद आहे.
भांडवली बाजारात कंपन्यांना त्यांच्या समभागांची खरेदी खुल्या तसेच निविदा योजनेमार्फत करता येते.
जानेवारी २०१४ पासून १४ कंपन्यांनी त्यांची पुनर्खरेदी योजना पार पाडली आहे. त्यांनी १२१०.६२ कोटी रुपयांचे आठ कोटी समभाग या माध्यमातून खरेदी केले आहेत. यामध्ये क्रॉम्प्टन ग्रीव्हज, अॅपटेक, यूपीएल लिमिटेड, जिंदाल स्टील अॅण्ड पॉवर आणि महाराष्ट्र सिमलेस यांचा समावेश आहे. पैकी जिंदाल स्टील अॅण्ड पॉवर कंपनीने ५००.८० कोटी रुपयांचे दोन कोटी समभाग पुनर्खरेदी केले, तर यूपीएलने १.४० कोटी समभाग हे २८२.५७ कोटी रुपयांना पुन्हा घेतले.
पी-नोट्समधील गुंतवणूक तीन वर्षांच्या उच्चांकावर
वैयक्तिक उच्च कमावत्या वर्गासाठी भांडवली बाजारातील समभाग खरेदीचा मार्ग असलेल्या पी-नोट्सच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक ही गेल्या तीन वर्षांच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचली आहे. त्यांच्याबरोबरच विदेशातील फंडांनीही मार्च २०१४ मध्ये २.०७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येथील शेअर बाजारात केली आहे.
पी-नोट्सद्वारे समभाग, रोखे आणि डेरिव्हेटीव्जमधील गुंतवणूक फेब्रुवारीच्या १,७२,७३८ कोटी रुपयांवरून २,०७,६३९ कोटी रुपये झाली आहे. यंदाची पी-नोट्समधील गुंतवणूक ही मे २०११ नंतरची सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे.
या कालावधीत ती २,११,१९९ कोटी रुपये होती. वैयक्तिक उच्च मालमत्ता असलेले, विदेशी फंडधारक तसेच विदेशी संस्था हे भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पी-नोट्सच्या पर्यायाला पसंती देतात. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून हा व्यवहार होतो. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया या कालावधीत सावरल्याने ही गुंतवणूक वाढल्याचे मानले जाते.
फेब्रुवारीच्या तुलनेत गेल्या महिन्यात वाढलेली गुंतवणूक ही १३ टक्के अधिक आहे. काही वर्षांपूर्वी या माध्यमातून होणाऱ्या विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत होते. मात्र सेबीने याबाबतचे नियम अधिक कडक केल्यानंतर हे प्रमाण कमी झाले आहे.