मुंबई : आर्थिक मंदावलेपणाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचा सध्याचा बाजार कल तीन वर्षांपूर्वीच्या निश्चलनीकरणाच्या कालावधीशी  बरोबरी साधणारा आहे. निराशेची छाया इतकी की, गेल्या तिमाहीत या क्षेत्राचा कल निर्देशांक १०० च्या मोजपट्टीवर थेट ४२ वर येऊन ठेपला आहे. निश्चलनीकरण कालावधीत, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान तो ४१ वर होता.

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासकांची देशव्यापी संघटना असलेली ‘नरेडको’ने मालमत्ता सल्लागार संस्था ‘नाइट फ्रँक’च्या सहकार्याने व ‘फिक्की’ या उद्योग संघटनेच्या पुढाकाराने जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यान या तिमाहीतील सर्वेक्षणाचे निष्कर्ष अहवाल रूपात  गुरुवारी प्रसिद्ध केले.

गेल्या काही वर्षांमध्ये सरकार तसेच रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत घर खरेदीला प्रोत्साहन म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना करूनही त्याचा अपेक्षित परिणाम दिसला नसल्याचे निरीक्षण या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

विद्यमान २०१९ सालातील जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत स्थावर मालमत्ता बाजार कल निर्देशांक ४७ तर एप्रिल ते जून या दुसऱ्या तिमाहीत तो ६२ होता. चौथ्या तिमाही तरी हा कल सुधारेल, याबाबत तिन्ही संस्थांना फारशी आशा नाही.

या निर्देशांकाचा ५० पुढील कल  बाजाराची आशादायी पातळी मानली जाते. तर त्यापेक्षा यंदा कमी नोंदला गेलेला स्तर हा स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. खरेदीदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने स्थावर मालमत्ता क्षेत्राचा बाजार कल निर्देशांक घसरल्याचे ‘नाइट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष शिशिर बैजल यांनी म्हटले आहे. वाणिज्य मालमत्ता क्षेत्राचा बाजार कल मात्र यंदा स्थिर असल्याचे अहवाल स्पष्ट करतो.

गृहविक्री रोडावली

मुंबई : जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशातील नव्या प्रकल्पासह एकूण घरविक्रीतही कमालीची घसरण नोंदली गेली आहे. प्रमुख ९ शहरातील नवीन गृह प्रकल्प यंदा ४५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. तर घर विक्री तब्बल २५ टक्क्यांनी खाली आली आहे. ‘प्रॉपटायगर’ या स्थावर मालमत्ता दलाली संस्थेमार्फत गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात गेल्या तिमाहीतील देशाच्या स्थावर मालमत्ता क्षेत्राचा नकारात्मक प्रवास वर्णन करण्यात आला आहे. गेल्याच महिन्यात अ‍ॅनारॉक, जेएलएल इंडिया यांनीही प्रमुख सात शहरातील घरविक्री १८ टक्क्यांनी कमी झाल्याचे स्पष्ट केले आहे. ‘प्रॉपटायगर’च्या आकडेवारीनुसार, गेल्या तिमाहीत घरविक्री वार्षिक तुलनेत ८८,०७८ वरून ६५,७९९ झाली आहे. नव्या सदनिका निर्माणाचा आकडाही वर्षभरापूर्वीच्या ६१,६७९ वरून ३३,८८३ वर येऊन ठेपली आहे.