अमित गुप्ता

संचालक, (कायदा आणि कंपनी व्यवहार)विक्रम सोलर.

अर्थव्यवस्थेच्या तब्येतीचा अर्थ-विश्लेषकांकडून वेध..

आज भारतीय अर्थव्यवस्थेसमोर जी काही आव्हाने उभी आहेत ती मुख्यत्त्वे देशाबाहेरील कारणांमुळे उभी ठाकली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे चढे भाव आणि या गोष्टीचा सहपरिणाम म्हणजे भारतीय चलनाचे जानेवारीपासून झालेले १५ टक्के अवमूल्यन त्याच्या अनुषंगाने रुंदावलेली वित्तीय तूट आणि महागाई वाढीची शक्यता या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मुख्य समस्या आहेत. या समस्या केवळ भारतासमोरच नसून भारतासह सर्वच उभरत्या अर्थव्यवस्था या प्रश्नांना कमी अधिक प्रमाणात सामोऱ्या जात आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेचा ढाचा मजबूत आसला तरी महाग झालेल्या आयातीमुळे विविध उत्पादकांचे उत्पादनमूल्यात वाढ झाली आहे. या वाढीचा सर्व हिस्सा ग्राहकाकडून वसूल करणे शक्य नसल्याने उत्पादकांच्या नफ्याच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. आमच्या मते, ही परिस्थिती फार वेळ राहणार नाही. देशाच्या लोकसंख्येत तरुणांची मोठी संख्या आणि तरुण वयामुळे उपभोग घेण्याची नैसर्गिक क्षमता असल्याने भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याबाबत आम्ही नक्कीच आशावादी आहोत.

अपारंपारिक उर्जा निर्मिती साधनांचे उत्पादक म्हणून आम्ही नेहमीच संधीच्या शोधात आसतो. चीनमधून आयात होणाऱ्या स्वस्त सामुग्री ही आमच्या समोरचे आव्हान आहे. ढासळत्या रुपयामुळे कच्च्या मालाच्या आयातीच्या किंमतीत वाढ होत असताना आमच्या उत्पादन खर्च अधिक माफक नफ्यापेक्षा कमी किंमतीत हलक्या दर्जाची सौरउर्जा सामुग्री आयात होत आहे. अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर हे या सरकारचे एक मुख्य धोरण आहे. त्याच्या बरोबरीनेच ‘मेक इन इंडिया’ हे सुद्धा एक धोरण आहे. अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या देशांतर्गत सामुग्री निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या मोठय़ा पाठिंब्याची आवश्यकता आहे.