बदलत्या आर्थिक घडामोडींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवारी विविध नियामक यंत्रणांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. नियामक यंत्रणांचा एकत्रित मंच असलेल्या वित्तीय स्थैर्य आणि विकास परिषदेच्या बैठकीला अर्थमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

दिल्लीतील बैठकीत रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी, इर्डाईचे अध्यक्ष सुभाष चंद्र खुंटिया, भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळाचे अध्यक्ष एम. एस. साहू, निवृत्तिवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकारणाचे अध्यक्ष रवी मित्तल आदी उपस्थित राहणार आहेत. मोदी सरकार नव्याने सत्तारूढ झाल्यानंतरची परिषदेची ही दुसरी बैठक असेल. गेल्या सहा वर्षांच्या तळात विसावलेल्या ५ टक्के विकास दराला गती देण्यासाठी सरकारने महिन्याभरात ४४ उपाययोजना जाहीर केल्या; पैकी १६ निर्णयांची अंमलबजावणीही लागू झाली आहे. एकूण उचलण्यात आलेल्या पावलांपैकी स्थावर मालमत्ता क्षेत्राकरिता तीन उपाययोजना आहेत.