मकरंद जोशी akarandjoshi@mmjc.in

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच एक घोषणा केली. त्यानुसार आपण व्यवसाय/धंदा जर कंपनीद्वारे करत असाल तर त्यांच्यासाठी प्राप्तीकर १०-१५% ने कमी केला आहे. या घोषणेची तुलना काही तज्ज्ञ व्यक्तींनी थेट निर्गुंतवणूक, जागतिकीकरणा संबंधातील घोषणेशी केली आहे. परंतु हा फायदा आपला व्यवसाय भागीदारी अथवा व्यक्तिगत व्यवसायात दिला गेलेला नाही. त्यामुळे कंपनी व्यतिरिक्त इतर माध्यमांमार्फत व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत.

साधारणपणे उद्योजक भागीदारी, प्रोप्रायटरी संस्था किंवा कंपनी या प्रकारच्या कायदेशीर पद्धतीत व्यवसाय करतात आणि या वेगळ्या संस्थांना पुढीलप्रमाणे प्राप्तीकर आकारला जातो. पुढील सुविधा म्हणजे कंपनी ऑक्टोबर २०१९ नंतर नोंदणीकृत केली असेल व नवीन यंत्रसामग्री (machinery) वापरून उत्पादन (manufacturing) केले तर प्राप्तीकर दर १७.१६% असेल.

वैयक्तिक आणि नवीन कंपनी यात तुलना करता प्राप्तीकर दरामध्ये ४२.७४ % ते १७.१६ % तफावत असेल. मिळवलेल्या नफ्यावर कमी कर याचा अर्थ अधिक आर्थिक तरलता, स्थिरता, अधिक गुंतवणूक, अधिक संधी इत्यादी. अशा परिस्थितीत कोणालाही वाटेल की आपला उद्योग कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत करावे.

व्यवसायात झालेला नफा व्यवसाय मालकांना घ्यायचा असेल तर कंपन्यांना १७.४७ % लाभांश वितरण कर (Dividend Distribution Tax) लागू होतो. परंतु तो कर भागीदारी अथवा इतर संस्थांमध्ये लागू होत नाही. व्यवसाय कंपनीतून करावा की भागीदारीतून हा एक यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी योग्य व्यावसायिक सल्ला घेणे आवश्यक आहे. परंतु १०-१५% करकपात हा खूप मोठा नजराणा कंपन्यांना दिला आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही.

कराव्यतिरिक्त इतरही अनेक बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.  उदा. भागीदार आणि भागधारक यांमधील फरक, गोपनीयता आणि पारदर्शकता, बँकांचा दृष्टिकोन, कर्मचारी वर्गाचे अभिप्राय, सामाजिक दृष्टिकोन इत्यादी. या सर्व बाबींचा सांगोपांग विचार करून उद्योजकाने आपला निर्णय घ्यावा आणि आपला उद्योग अधिकाधिक परिणामकारकरित्या चालवावा.

(लेखक कंपनी सचिव आहेत.)