नवी दिल्ली : सरलेल्या आर्थिक वर्षांत हेतुपुरस्सर कर्ज थकबाकीदार (विल्फुल डिफॉल्टर्स) संख्येने वाढले असल्याची कबुली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली. ३१ मार्च २०२१ अखेर त्यांची संख्या २,२०८ वरून २,४९४ इतकी वाढल्याचे त्या म्हणाल्या.

मागील तीन आर्थिक वर्षांसंबंधी रिझव्‍‌र्ह बँकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना संचयित अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) आणि निर्लेखित कर्जे यातून ३,१२,९८७ कोटी रुपयांची वसुली करता आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री सीतारामन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल दिली. तथापि या तीन वर्षांच्या कालावधीत, हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांची संख्याही वाढत आली आहे.  ३१ मार्च २०१९ अखेर ही संख्या २,०१७ अशी होती, जी ३१ मार्च २०२० अखेर २,२०८ वर गेली आणि ३१ मार्च २०२१ अखेर ती आणखी वाढून २,४९४ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बडय़ा थकबाकीदारांबाबत बँकांकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, रिझव्‍‌र्ह बँकेने अशा बुडीत (एनपीए) म्हणून वर्गीकृत असलेल्या कर्जदारांची एकूण थकीत रक्कम ही ३१ मार्च २०१९, ३१ मार्च २०२० आणि ३१ मार्च २०२१ अशा सलग तीन वर्षांत अनुक्रमे ५,७३,२०२ कोटी रुपये, ४,९२,६३२ कोटी रुपये आणि ४,०२,०१५ कोटी रुपये अशी घटत आली आहे, अशी सीतारामन यांनी माहिती दिली.

बँकांनी कर्ज थकबाकीच्या वसुलीसाठी कर्जदार किंवा जामिनदाराच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यासाठी तत्परतेने पावले उचलणे आवश्यक आहे. गरज पडेल त्या प्रमाणे हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांविरूद्ध फौजदारी कारवाईदेखील बँका करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

 ‘एनपीएमध्ये घसरण

बँकांमधील एकूण अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण ३१ मार्च २०२१ रोजी ९.११ टक्क्य़ांवर ओसरले आहे, ज्याचे प्रमाण ३१ मार्च २०१५ अखेर ११.९७ टक्के होते, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिली. नवनियुक्त केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत सोमवारी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, बुडीत कर्जाची रक्कम वर्षभरात ६१,१८० कोटींनी घसरून, मार्च २०२१ अखेर ८.३४ लाख कोटी रुपये झाली असल्याचे स्पष्ट केले.

१.३१ कोटींची कर्जे निर्लेखित

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सरलेल्या २०२०-२१ आर्थिक वर्षांत १,३१,८९४ कोटी रुपयांची कर्जे निर्लेखित (राइट-ऑफ) केली. आधीच्या वर्षांत निर्लेखित केल्या गेलेल्या १,७५,८७६ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण घसरले आहे.