नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकप्रमुखांशी येत्या सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी चर्चा करणार आहेत.

मंदीसदृश अर्थव्यवस्थेत विविध आर्थिक उपाययोजना जाहीर करूनही बँकांच्या पतपुरवठय़ाला गती मिळत नसल्याच्या विषयावर या बैठकीत चर्चा आणि पाठपुरावा केला जाण्याची शक्यता आहे.

गैर बँकिंग वित्तीय कंपन्या तसेच सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना करावयाच्या कर्जपुरवठय़ाबाबतही अर्थमंत्री यावेळी बँकप्रमुखांची भूमिका जाणून घेण्याची शक्यता आहे.

देशातील व्यापारी बँका वाढत्या थकीत कर्जाचा सामना करत आहेत. तर आयएल अँड एफएसच्या कर्जफेड अयशस्वीतेमुळे एकूणच गेल्या वर्षांपासून गैर बँकिंग वित्त कंपन्या अडचणीत आल्या आहेत.

अशा घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांची चालू महिन्यात दुसऱ्यांदा बँकप्रमुखांशी भेट होत आहे. व्यापारी बँकांना करण्यात आलेल्या कर्ज मेळाव्याच्या आयोजन करण्याच्या केलेल्या आवाहनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. चालू महिन्यातील दोन टप्प्यातील कर्ज मेळाव्याच्या मध्यातच ही बैठक होत आहे.

७ ऑक्टोबर रोजी संपलेल्या पहिल्या टप्प्यात हे कर्जमेळावे देशातील विविध ४०० जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आले. त्याचा आढावा यावेळी अर्थमंत्री घेण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या टप्प्यात, ऐन दिवाळीच्या तोंडावर २१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान देशातील १५० जिल्ह्यांमध्ये कर्ज मेळावे आयोजित केले जाणार आहेत.