21 September 2020

News Flash

बँकप्रमुखांबरोबर अर्थमंत्र्यांची आज बैठक

कर्ज स्वस्ताईबाबत बँकांच्या कामगिरीचा आढावा अपेक्षित

| September 19, 2019 02:50 am

(संग्रहित छायाचित्र)

कर्ज स्वस्ताईबाबत बँकांच्या कामगिरीचा आढावा अपेक्षित

नवी दिल्ली : कर्जाचे व्याजदर कमी करून लोकांना परवडणाऱ्या दरात कर्जाची उपलब्धता केली जावी, यासाठी आग्रही असलेल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बँकांच्या या संदर्भात प्रत्यक्ष कामगिरीचा आढावा, बँकप्रमुखांच्या गुरुवारी नियोजित बैठकीत घेणार आहेत.

रिझव्‍‌र्ह बँकेकडून सलग चार बैठकांमध्ये रेपो दर १.१० टक्क्य़ांनी कमी करण्यात आला आहे. वाणिज्य बँकांचे कर्जावरील व्याजाचे दर हे रेपो दराशी संलग्न करून कमी केले गेले, तर जनसामान्यांपर्यंत रिझव्‍‌र्ह बँकेच्या कपातीचे लाभ अधिक जलदतेने व प्रभावीपणे पोहचतील, असा अर्थमंत्र्यांचा होरा आहे. त्यानुसार, रिझव्‍‌र्ह बँकेने १ ऑक्टोबरपासून बँकांनी कोणतीही कर्ज ही रेपो दर अशा बाह्य़ मानदंडांशी संलग्न करून वितरीत करावीत, असे फर्मान काढले आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या या फर्मानानंतर स्टेट बँकेसह, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक आदी काही बँकांनी त्यांचे गृह कर्ज, वाहन कर्ज यांचे व्याज दर  हे रेपो दराशी संलग्न करून लागू केले आहेत. अन्य बँकांना व्याजदर कपातीबाबत असलेल्या अडचणी जाणून घेत, अर्थमंत्री गुरुवारच्या बैठकीत या संबंधाने पाठपुरावा करणे अपेक्षित आहे.

वयाची सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांना तसेच शारीरिक विकलांगांना त्यांच्या घरापर्यंत जात बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या मुद्दय़ाबाबत नेमकी कोणती पावले टाकली गेली, याचाही अर्थमंत्री या बैठकीतून मागोवा घेणे अपेक्षित आहे.

सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना तसेच जनसामान्यांच्या गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्जाच्या मंजुरीची प्रक्रिया गतिमान व्हावी, यासाठी कर्जासाठी अर्जाची प्रक्रिया व त्या अर्जाचा माग हा ऑनलाइन घेता यावा, असा प्रक्रियात्मक बदलही अर्थमंत्री सीतारामन यांनी सूचित केला आहे. बँकांची या संदर्भातील सज्जता या बैठकीतून तपासली जाणे अपेक्षित आहे.

कर्जफेड पूर्ण झाल्यावर तारण म्हणून बँकांकडे राखून ठेवलेले दस्तऐवज १५ दिवसांच्या आत मोकळे करून, कर्जदाराला परत केले जावेत, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी गेल्या महिन्यात अर्थप्रोत्साहक घोषणा करताना केली होती. बँकेतर वित्तीय कंपन्यांना वित्तपुरवठा खुला करून त्यांच्याकडे पुरेशी रोकडसुलभता राखण्याबाबतही त्यांनी त्यावेळी घोषणा केल्या होत्या, त्याचा या बैठकीतून पाठपुरावा केला जाणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 2:50 am

Web Title: finance ministers meeting today with bank chiefs zws 70
Next Stories
1 एरिक्सनकडील ५७७ कोटी मिळविण्यासाठी मुंबई न्यायाधिकरणाकडे जाण्याचा ‘आरकॉम’ला आदेश
2 वाहन उद्योगाचा हिरमोड?
3 ‘जिओ’च्या ग्राहकसंख्येत ८५ लाखांनी भर
Just Now!
X