निर्मिती क्षेत्रावरील मंदीचे मळभ अद्यापही कायम असल्याचे मेमधील औद्योगिक उत्पादन दराने पुन्हा स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या महिन्यात विकासदरात १.६ टक्के घट नोंदवून औद्योगिक उत्पादनाने गेल्या ११ महिन्यांतला तळ गाठला.
निर्मिती, खनिकर्म अशा साऱ्याच क्षेत्रात सध्या सारे काही ठप्प पडले आहे, असे दर्शविणारे केंद्रीय सांख्यिकी संघटनेचे आकडे शुक्रवारी सायंकाळी जारी झाले. एप्रिलच्या २.५ टक्क्यांच्या तुलनेत मे महिन्यातील औद्योगिक उत्पादन दर १.६ टक्क्यांवर आला आहे.एकूण २२ उद्योग क्षेत्रांपैकी निम्मे उद्योग हे मेमध्ये नकारात्मक स्थितीत राहिले आहेत.
भाज्यांसह अनेक खाद्य वस्तूंच्या वाढत्या दरांनी किरकोळ महागाईत भर टाकण्याचे कार्य बजावले आहे. जूनमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईचा दर ९.८७ टक्क्यांवर गेला आहे. मेमध्ये हाच दर ९.३१ टक्के होता. तत्पूर्वी सतत तीन महिने तो घसरत होता. आता मात्र त्याने पुन्हा उचल खाल्ली असून पुन्हा दोन अंकी स्तराकडे त्याचा प्रवास सुरू आहे. गेल्या महिन्यात भाज्यांच्या किमती मोठय़ा प्रमाणात म्हणजे तब्बल १४.५५ टक्के वधारल्या आहेत. तर जूनमध्ये एकूण अन्नधान्याचा महागाईचा दर आधीच्या महिन्यातील १०.६५ टक्क्यांपेक्षा उंचावून ११.८४ टक्के झाला आहे. धान्यांमध्ये सर्वाधिक तांदळाचे दर १७.५९ टक्क्यांनी वाढले आहेत.
भाज्यांची महागाईत भर
ग्राहक किंमत निर्देशांक १०%नजीक

निर्यातही ४.६% घटली