मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी निवृत्त सनदी अधिकाऱ्याच्या नियुक्तीने या महत्वाच्या सार्वजनिक संस्थेच्या उचित कारभाराबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे, असे नमूद करीत शक्तिकांत दास यांच्या गव्हर्नरपदासाठी निवडीवर उघड टीका मूळ भारतीय आणि सध्या अमेरिकेतील प्रतिष्ठित मेसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)चे अर्थशास्त्राचे प्राध्यापक अभिजीत बॅनर्जी यांनी केली.

बॅनर्जी हे एका व्याख्यानासाठी मुंबईत आले होते आणि सरकारकडून सायंकाळी झालेल्या नव्या गव्हर्नरांच्या नावाच्या घोषणेनंतर लगेचच प्रसिद्धी माध्यमांपुढे त्यांनी ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. वादग्रस्त नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची बाजू सांभाळण्याची भूमिका बजावलेल्या शक्तिकांत दास यांच्यासारख्या निवृत्त सनदी अधिकाऱ्याची रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती म्हणजे या महत्त्वा्च्या संस्थेच्या कारभाराबाबत भीतीदायक साशंकता निर्माण करणारे आहे, असे ते म्हणाले. किंबहुना गव्हर्नरपदावरून ऊर्जित पटेल यांचा राजीनामा, हाच तणाव निर्माण झाल्याचा संकेत असून, हे चिंताजनक आहे, रिझव्‍‌र्ह बँकेची अप्रतिष्ठा होणार नाही याची काळजी घेतली जायला हवी, असे ते म्हणाले.

विश्वासार्हता आणि स्वायत्तता महत्वाची – सुब्बराव

नवी दिल्ली : मध्यवर्ती बँक म्हणून असलेल्या महत्वाच्या संस्थेची विश्वासार्हता आणि स्वायत्तता पुन:स्थापित करण्याचे कार्य नवीन गव्हर्नरांना प्राधान्याने करावे लागेल, अशी प्रतिक्रिया रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीला दिली.  शक्तिकांत दास यांची त्या पदावर नियुक्तीची सरकारकडून घोषणा होण्यापूर्वी त्यांनी हे विधान केले आहे. ऊर्जित पटेल यांना राजीनामा द्यावा लागला त्यामागे त्यांना असह्य़ ताणाला सामोरे जावे लागले आणि तो पेलण्याच्या पलिकडे गेला असावा असे दिसून येते, असेही ते म्हणाले. सुब्बराव यांचेही गव्हर्नरपदाच्या कार्यकाळात केंद्र सरकारबरोबर मतभेद आणि संघर्षांचे अनेक प्रसंग दिसले आहेत. तथापि पटेल यांच्या राजीनाम्याच्या घटनेचे आत्मपरीक्षण करून धडे घेण्याइतकी परिपक्वता आणि विवेक सरकारकडे आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘दुसरी इनिंग’

मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेचे २५ वे गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेले शक्तिकांत दास हे तब्बल ३७ वर्षे देशाच्या प्रशासनिक सेवेतून निवृत्त झालेले सनदी अधिकारी असून, गव्हर्नरपद हे त्यांच्या कारकीर्दीची सुरू झालेली दुसरी ‘इनिंग’ आहे. सोमवारी ऊर्जित पटेल यांच्या गव्हर्नरपदाच्या धक्कादायक राजीनाम्यानंतर, त्यांच्या जागी अर्थतज्ज्ञाऐवजी केंद्रीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता सोमवारीच विश्लेषकांनी वर्तविली होती.

भारतीय प्रशासनिक सेवेत तामिळनाडूच्या १९८०च्या तुकडीतील सनदी अधिकारी राहिलेले शक्तिकांत दास यांची केंद्रीय अर्थमंत्रालयात लक्षणीय कारकीर्द राहिली आहे. २०१५ ते २०१७ सालात केंद्रीय अर्थव्यवहार सचिव या पदावर कार्यरत असताना, त्यांची मध्यवर्ती बँकेशी आणि तिच्या कामकाजाशी नजीकचे संबंध निर्माण झाले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळात भूमिका बजावली आहे. १५ व्या वित्त आयोगाचेही ते सदस्य राहिले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निश्चलनीकरणाच्या अकस्मात निर्णयानंतर, या संपूर्ण प्रक्रियेतून देशभर निर्माण केलेला चलन-कल्लोळाचे जनतेच्या संघटित रोषात रूपांतर होऊ नये, या दृष्टीने आवश्यक नियोजन आणि उपाययोजना करण्यात त्या वेळी केंद्रीय अर्थमंत्रालयात अर्थव्यवहार सचिव म्हणून कार्यरत शक्तिकांत दास यांची प्रमुख भूमिका होती. याच अर्थमंत्रालयातील कंपनी व्यवहार सचिव या पदावरून ३१ मे २०१७ रोजी ते सेवानिवृत्त झाले. त्या पश्चात ती जी-२० राष्ट्रगटातील पूर्णवेळ प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांची ही नियुक्ती ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत होती.

नवी दिल्लीच्या प्रतिष्ठित सेंट स्टीफन महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवीधर असलेले दास यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासनिक कारकीर्दीत, केंद्रीय अर्थमंत्रालयात सह-सचिव (व्यय), तामिळनाडू सरकारचे महसूल प्रशासनाचे विशेष आयुक्त, तामिळनाडूमध्ये उद्योग विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

केंद्रात विविध मंत्रालयांमध्ये सचिव म्हणून कार्यरत होण्याआधी, सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक, ओएनजीसी आणि भारतीय आयुर्विमा महामंडळावर त्यांची संचालक म्हणूनही कामगिरी राहिली आहे.