तिमाही पतधोरणात चालू खात्यातील वित्तीय तुटीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी यंदा ती विक्रमी पातळीवर पोहोचेल, असा इशारा दिला आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेने मुंबईत उभारलेल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. २०१२-१३ मध्ये चालू खात्यातील तूट ही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या ४.२ टक्के राहिली आहे. तर जुलै ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांतील दुसऱ्या तिमाहीत ती ५.३ टक्के नोंदली गेली. मार्च २०१३ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षांत ही तूट यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवितानाच ती आतापर्यंतच्या टप्प्यापेक्षा सर्वाधिक असेल, अशी भीतीही गव्हर्नरांनी व्यक्त केली.
कमी विकास दराकडे दुर्लक्ष करीत, वाढत्या महागाईवर नजर ठेवून सुब्बराव यांनी यापूर्वी वेळोवेळी व्याजदर कपात टाळली होती. यंदा मात्र तब्बल नऊ महिन्यानंतर रेपो दरात पाव टक्का कपात करतानाच त्यांनी वाढत्या वित्तीय तुटीवर चिंता व्यक्त केली होती. असे करताना अंदाजित तुटीचे प्रमाण त्यांनी मात्र दिले नव्हते. गेल्या आर्थिक वर्षांत नोंदविलेली ४.२ टक्के वित्तीय तूट ही इतिहासातील सर्वाधिक आहे. रिझव्‍‌र्ह बँक आणि केंद्र सरकार यांच्या दाव्याप्रमाणे २.५ ते ३ टक्के तूट ही सहन करण्यासारखी आहे.