रिझव्‍‌र्ह बँकेने लोकांकडे अनुत्पादित पडून असलेल्या सोन्याच्या वित्तीय उपयोगितेला चालना देण्यासाठी विविधांगी उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून सोने तारण कर्ज हे सोन्याच्या किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत देण्याची मुभा रिझव्‍‌र्ह बँकेने या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांना दिली आहे. सोने गहाण ठेवल्यास सोन्याच्या किमतीच्या ६० टक्के इतकेच कर्ज वितरीत वितरीत करता येईल, अशी सुधारणा रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्याच वर्षी केली होती, ती आता मागे घेतली गेली आहे.
रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या निर्णयाच्या परिणामी मनप्पुरम फायनान्स आणि मुथ्थूट फायनान्स या शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या दोन्ही कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा जोर चढला. गुरुवारी या दोन्ही समभागांच्या भावांनी फुगून २० टक्क्यांच्या वरच्या सर्किट गाठले. रिझव्‍‌र्ह बँकेने के.यू.बी. राव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कार्यदलाने सोने तारण कर्जमर्यादेबाबत फेरविचार करण्याची केलेली शिफारस अखेर मध्यवर्ती बँकेने मान्य केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे सोने हव्यास करण्यासाठी अर्थमंत्रालय तसेच रिझव्‍‌र्ह बँकेकडून वेगवेगळ्या उपायांवर विचार सुरू असतानाही, या मौल्यवान धातूंची मागणी व भावातील वाढ निरंतर सुरूच आहे. नववर्षांच्या पहिल्या तीन दिवसात मुंबईच्या सराफ बाजारात स्टँडर्ड सोन्याचा भाव हा प्रति तोळा ३५० रुपयांनी वाढला आहे, तर चांदीचा प्रति किलो भाव तब्बल १३१० रुपयांनी वधारला आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय बाजारात याच काळात मौल्यवान धातूंचे भाव ओसरले आहेत. देशांतर्गत सोन्याचा भाव वधारत असल्याचे आढळताच, अथवा ते आणखी महागणार अशी आवई उठताच लोकांचा घाईघाईने खरेदी करण्याचा कल दिसू लागतो, असा हा उलटा परिणाम प्रत्यक्षात घडत असल्याचे बाजार विश्लेषकाने मत व्यक्त केले.