|| भालचंद्र जोशी

मुलांचे शिक्षण हा  प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करणे   महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर मुलाला कोणत्या प्रकारच्या शिक्षणामध्ये रस आहे म्हणजेच त्याच्या शिक्षणाच्या दिशेने असणारा कल जाणून घेऊ न त्याप्रमाणे त्याच्या शिक्षणाचे आर्थिक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. मुलांच्या शिक्षणासाठी विविध टप्पे आणि त्यासाठी येणारा खर्च आणि त्याचे आर्थिक नियोजन या संबंधीचे विविध पैलू आपण पाहुयात.

शिक्षण ही अशी गोष्ट आहे की, त्यावर खर्च करताना आपण मागचा पुढचा विचार करत नाही. कारण हे शिक्षण आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करते. आजच्या युगात शिक्षण ही एक आधुनिक काळाची गरज असून त्यावर घेतला जाणारा खर्च हा मुलांच्या उज्वल भविष्यासाठी एक गुंतवणूक आहे. म्हणूनच जास्तीत जास्त पालक आपल्या मुलांना उत्तम संभाव्य शिक्षण देण्यासाठी आर्थिक नियोजनाचे महत्व आणि आवश्यकता लक्षात घेत आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन करण्याचे वेगवेगळे टप्पे कोष्टकात दिले आहेत.

या कोष्टकाप्रमाणे शिक्षणाचे आर्थिक नियोजन हे मूल जन्माला आल्यापासून करणे आवश्यक आहे. शैक्षणिक आर्थिक खर्चाचा विचार करायचा असेल तर वार्षिक शिक्षणावरील खर्च (शाळा, शिकवणी इत्यादी) आज कुठेही अंदाजे ५० हजार  ते २ लाख रुपयांपर्यंत आहे. उच्च शिक्षण हे अतिशय महागडे असून व्यावसायिक पदवी मिळवण्यासाठी खर्च भारतात कोठेही अंदाजे १० लाख ते २० लाख आणि परदेशातील शिक्षणासाठी अंदाजे ४० ते ५० लाख रुपये आहे.

आपल्या मुलांच्या शिक्षणाचे टप्पे लक्षात घेऊ न वेगवेगळ्या टप्प्यांसाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. या दृष्टीने नियोजन करत असताना वेगवेगळ्या कालावधीसाठी म्युच्युअल फंडांच्या विविध प्रकारच्या मालमत्ता श्रेणींमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. आपल्या मुलांच्या शिक्षणाची योजना बनवण्यासाठी, प्रथम योग्यरित्या मालमत्ता मिश्रणाची निवड करून भविष्यात किती मिळकत अपेक्षित आहे हे निर्धारित केले पाहिजे आणि नंतर जतन आणि ध्येयाच्या दिशेने गुंतवणूक करावी. म्हणूनच आधी म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन केल्यास आपल्या मुलांचे शिक्षण सुरळीतपणे पार पाडता येईल.

मुलांच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांवरील आर्थिक नियोजनासाठी म्युच्युअल फंडांमधील ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ म्हणजे ‘एसआयपी’ हा एक सक्षम गुंतवणुकीचा पर्याय आहे. कारण एसआयपी आपल्याला चक्रवाढ व्याज मिळवून देऊ न लहान आणि नियमित गुंतवणूक करून ठराविक कालावधीमध्ये निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करते.

मुलाचे शिक्षण हे प्रामुख्याने दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. डेट किंवा हायब्रिड योजनांमधील गुंतवणूक ही मध्यम कालावधीची असून त्यात असणारी जोखीम ही तुलनात्मकदृष्टय़ा  आहे.  इक्विटी फंडांमधील गुंतवणूक ही दीर्घ मुदतीत संपत्ती निर्माण करण्यासाठी आदर्श मानली जाते. म्युच्युअल फंडांद्वारे केलेल्या गुंतवणुकीचा प्रमुख फायदा हा आहे की या विषयातील तज्ज्ञ असलेल्या व्यावसायिक फंड व्यवस्थापकांद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. आर्थिक नियोजनासाठी आणि त्याच्या नियमित आढाव्यासाठी योग्य आर्थिक सल्लागाराची मदत अवश्य घ्यावी.

आपल्या पाल्याच्या शिक्षणाला जर उत्तम आर्थिक नियोजनाची जोड दिली तर निश्चित त्याचे उज्वल भवितव्य घडवण्यास मदत होईल. लेखक गेली २७ वर्षे बँकिंग आणि आर्थिक सेवा क्षेत्रात सक्रिय कार्यरत असून म्युच्युअल फंड कंपनीच्या गुंतवणूकदार सेवा आणि परिचलन विभागाचे प्रमुख आहेत.’