वाढत्या डिजिटल सक्रियतेसह ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांची जोखीमही भारतीयांबाबत वाढली असून, त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे प्रमाण हे ऑनलाइन व्यवहार करणाऱ्या प्रत्येक चौथ्या भारतीय ग्राहकाला आहे, असे एका विश्वासपात्र अहवालाचे निरीक्षण आहे.

जगभरातील वित्तविषयक माहितीची मोजदाद ठेवणाऱ्या ‘एक्स्पीरियन’च्या या अहवालाच्या मते, ऑनलाइन आर्थिक व्यवहार करणाऱ्या २४ टक्के भारतीयांनी ही जोखीम थेट अनुभवली आहे. दूरसंचार सेवा (५७ टक्के), बँक (५४ टक्के) आणि विक्री (४६ टक्के) ही ऑनलाइन जोखीमेतून भारतातील सर्वाधिक हानी पोहोचलेली क्षेत्रे असल्याचे हा अहवाल सांगतो.

एक्स्पीरियनच्या अहवालाच्या मते, आशिया-पॅसिफिक क्षेत्रात डिजिटल सुविधांच्या उपभोगाचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. सर्वेक्षण केल्या गेलेल्या ९० टक्के लोकांना ते डिजिटल सुविधा वापरत असल्याचे सांगितले. मात्र चुकीच्या पद्धतीने गोपनीय माहिती  सामायिक करण्याचे ७० टक्के असे सर्वाधिक प्रमाण भारतात दिसून येते, जे जोखीमयुक्त असल्याचे अहवाल सांगतो.

भारतीय त्यांची माहिती बँका (५० टक्के) आणि ब्रॅण्डेड रिटेलर्सकडे निर्धास्तपणे सामायिक करीत असल्याचे आढळून येते. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांचा लाभ मिळविण्यासाठी अशी माहिती सामायिक करणे गैर नसल्याचे आढळून येते. घरबसल्या सोय हा घटक त्यामागे असतो. मात्र सामायिक केलेल्या माहितीचे जाणीवपूर्वक संरक्षणाचे प्रमाण भारतीयांमध्ये केवळ ६ टक्के आहे. तुलनेत जपानमध्ये हेच प्रमाण ८ टक्के असे आहे. ऑस्ट्रेलिया, चीन, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, थायलंड आणि व्हिएतनाम या १० देशांत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.