देशात प्रथमच २०१७ मध्ये मुंबईत सुरू करण्यात आलेले वैशिष्टय़पूर्ण पॉड हॉटेलने अर्थात अर्बनपॉडने देशाच्या आदरातिथ्य क्षेत्रात एका ‘नवीन श्रेणीची’ ओळख लोकांना करून दिली. चीन आणि जपानमधील लोकप्रिय कॅप्स्यूल हॉटेलच्या धर्तीवर, एका रात्रीपुरते निजणे आणि अंघोळ इतकीच गरज असलेला वाजवी दरातील पर्याय म्हणून अर्बनपॉड सुरू झाले आहे. गेल्या एका वर्षांत अर्बनपॉडचा पाहुणचार भारतीय तसेच परदेशातील प्रवाशांनीही घेतला आहे. विशेष म्हणजे अर्बनपॉडला भेट देणाऱ्या प्रवाशांमध्ये प्रचंड वैविध्य असून जगभरातील ४० हून अधिक देशांच्या नागरिकांनी अर्बनपॉडच्या सेवेचा लाभ घेतला आहे. अर्बनपॉड प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक हिरेन गांधी यांनी माहिती दिली की, यापूर्वी फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रवाशांमध्ये पॉड हॉटेल्स लोकप्रिय होती. आता मात्र भारतीय प्रवासीही या संकल्पनेकडे आकर्षित होत आहेत. अर्बनपॉडच्या यशाचे वैशिष्टय़ म्हणजे येथे ३० ते ४५ या वयोगटातील मोठय़ा संख्येतील पर्यटक येत असतात.