तंत्रस्नेही ‘सुपरमार्ट’ची मुंबईतूनही सुरुवात

मुंबई : तंत्रस्नेही मंचावर किराणा वस्तू विक्रीतील आघाडीचा समूह असलेल्या वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टने मुंबई महानगरवासीयांनाही सेवा पुरविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.  एक लाख विक्रेत्यांद्वारे शहरातील ८५ ते ९० टक्के भागात पोहोचण्याचे लक्ष्य फ्लिपकार्टने राखले असून सुरळीत किराणा वस्तू पुरविठय़ाकरिता भिवंडीत भांडारगृह आहे.

वॉलमार्टचे देशातील निवडक शहरात प्रत्यक्ष दालनाद्वारे किराणा वस्तू पुरवठय़ातील अस्तित्व आहे. वॉलमार्टचा या क्षेत्रात ६५ टक्के वाटा आहे. तर फ्लिपकार्टच्या माध्यमातून तंत्रस्नेही माध्यमाद्वारे या बाजारपेठेतील मोठा हिस्सा काबीज करण्याचा प्रयत्न आहे. भारतातील एकूण किराणा वस्तू बाजारपेठ २८,००० कोटी रुपयांची असून त्यातील ई-व्यापार मंचाचा वाटा केवळ अर्धा टक्का आहे.

फ्लिपकार्टने दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर स्वत:चे ‘सुपरमार्ट’ तंत्रस्नेही दालन मुंबईपूर्वी बंगळूरु, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्ली या देशातील प्रमुख तीन शहरांमध्ये सुरू केले होते. त्याला मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावरच मुंबई बाजारपेठेतही शिरकाव करण्याचे धाडस करण्यात आल्याचे फ्लिपकार्टद्वारे स्पष्ट करण्यात आले.

इतर शहरांच्या तुलनेत महानगरातील किराणा वस्तू पुरवठय़ाबाबतची आव्हाने निराळी असून कंपनी तिच्या शेतकरी, व्यापारी, लघू उद्योगांच्या सहकार्याने त्यावर मात करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. फ्लिपकार्टने संजीवनी अ‍ॅग्रोच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ७,००० शेतकऱ्यांबरोबर सहकार्य केले आहे.

‘सुपरमार्ट’ नाममुद्रेंतर्गत फ्लिपकार्टच्या तंत्रस्नेही मंचावर १०,००० उत्पादने उपलब्ध होणार असून त्यासाठी ग्राहकांना किमान ४०० रुपयांपर्यंतची खरेदी करणे अनिवार्य आहे. शिवाय ६०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय घरपोच किराणा वस्तू पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती फ्लिपकार्टच्या किराणा व्यवसायाचे प्रमुख मनीष कुमार यांनी सांगितले.

सुपरमार्टचे विस्तीर्ण आभाळ

* देशातील किराणा वस्तू बाजारपेठ २८,००० कोटी रुपयांची असून त्यातील ई-व्यापार मंचाचा वाटा केवळ अर्धा टक्का आहे.

* फ्लिफकार्टने नव्या व्यवसायासाठी १ लाख विक्रेते आणि ७ हजार शेतकऱ्यांशी सहकार्य केले आहे.