ऑनलाइन फॅशन रिटेलर मिन्त्रा आता फ्लिपकार्टच्या अखत्यारित आली आहे. सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या माध्यमातून हा देशातील ई-कॉमर्समधील सर्वात मोठा व्यवहार नोंदला गेला आहे. आपल्याला पूर्वाश्रमी रोजगार देणारी अमेझॉन.कॉम भारतीय व्यवसाय क्षेत्रात विस्तारत असतानाच फ्लिपकार्टच्या संस्थापकाने या व्यवहाराद्वारे तिच्याशी एकहाती टक्कर देण्याचे ठरविले आहे.
अमेझॉनमध्ये काम केलेल्या व फ्लिपकार्टचे सहसंस्थापक राहिलेल्या सचिन बन्सल यांनी मिन्त्रावर १०० टक्के मालकी मिळविण्याचे जाहीर करतानाच कंपनी फॅशन व्यवसाय विस्तारासाठी नजीकच्या कालावधीत १० कोटी डॉलरची गुंतवणूक करील, असा मनोदय यानिमित्ताने व्यक्त केला. या व्यवहारानंतर मिन्त्राचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश बन्सल हे फ्लिपकार्टच्या संचालक मंडळावर नियुक्त होतील.
संकेतस्थळाच्या माध्यमातून पुस्तकांच्या विक्रीपासून फ्लिपकार्टने २००७ मध्ये प्रत्यक्षात ई-कॉमर्स व्यवहाराला सुरुवात केली होती. यानंतर कंपनीने विविध वस्तू, विद्युत उपकरणे आदीही याच व्यासपीठावर उपलब्ध करून दिली. कंपनीने एक अब्ज डॉलरच्या वार्षिक विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने अस्तित्वात आल्यापासून ५० कोटी डॉलरची निधी उभारणी केली आहे. मिन्त्रावरून विविध ६५० हून अधिक ब्रॅण्डच्या २० कोटी डॉलरचे व्यवहार नोंदले गेले आहेत.
अमेरिकेच्या अमेझॉनमधून बाहेर पडत बिन्नी व सचिन बन्सल यांनी २००७ मध्ये भारतात फ्लिपकार्ट स्थापन केली. देशातील ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनीही ती लगेचच बनली. मोबाइल हॅण्डसेटच्या विक्रीच्या माध्यमातून अमेझॉनने गेल्याच वर्षांत येथील क्षेत्रात पदार्पण केले. वस्तूंची दुसऱ्याच दिवशी पोच यामुळे अमेझॉन अल्पावधीत लोकप्रिय झाली. तिला टक्कर देण्यासाठी बन्सल यांनी मिन्त्राला आपल्या कवेत घेतले.
भारतीय ई-कॉमर्स बाजारपेठ ही १३ अब्ज डॉलरची असून गेल्या काही वर्षांत या उद्योगाचा मोठा विस्तार झाला आहे. अनेक महिने फारसा नफा व महसूल न मिळूनही निधी उभारणीसाठी या क्षेत्रातील अनेक कंपन्या चर्चेत राहिल्या आहेत. या क्षेत्रातील ५२ पैकी केवळ १८ कंपन्यांनी गेल्या तीन वर्षांत ७० कोटी डॉलर उभे केले आहेत. फ्लिपकार्ट, मिन्त्रा, स्नॅपडिल, जबॉन्ग, इबे, अमेझॉन, क्विकर, ओलेक्ससारख्या कंपन्या या क्षेत्रात स्पर्धा राखून आहेत.
इबेधारकांच्या पासवर्डचे नूतनीकरण
ई-कॉमर्समधील अमेरिकी कंपनी इबेच्या डाटाबेस चोरण्याच्या प्रयत्नातून कंपनीने संकेतस्थळ वापरणाऱ्यांना त्यांचे पासवर्ड बदलण्यास सांगितले आहे. या प्रकरणात नेमका कुणाचा हात आहे, हे स्पष्ट झाले नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून १४.५० कोटी नियमित वापरकर्त्यांना आता पासवर्ड बदलावे लागणार आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावर फेब्रुवारीअखेर व मार्चच्या सुरुवातीदरम्यान हल्ला करीत चोरटय़ांनी धारकांची माहिती चोरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामध्ये त्यांच्या नाव, पत्त्यासह दूरध्वनी क्रमांक, निवासी पत्ते, जन्मतारीख यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.