वॉलमार्टने मालकी मिळविलेल्या फ्लिपकार्ट समूहाने आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड (एबीएफआरएल)मध्ये १,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ७.८ टक्के हिस्सा अधिग्रहित केला आहे. फॅशन वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रातील ‘एबीएफआरएल’च्या क्षमतांचा आणि विक्री दालनांच्या शृंखलेचा प्रभावी उपयोग यातून फ्लिपकार्ट करणार आहे.

उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या विक्री क्षेत्रातील कंपनीतील हिस्सेदारीसाठी फ्लिपकार्टने अधिमूल्यही मोजले आहे. १,५०० कोटींच्या मोबदल्यात ७.८ टक्के हिस्सेदारी, म्हणजे प्रति समभाग २०५ रुपये मोजण्यात आले. आदित्य बिर्ला फॅशनच्या गुरुवारी भांडवली बाजारातील समभागाच्या १५३.४० रुपये या बंद भावाच्या तुलनेत ३३.६ टक्के अधिक किंमत या व्यवहारासाठी फ्लिपकार्टकडून देण्यात आली.

आदित्य बिर्ला फॅशन या भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमातून आपला आर्थिक ताळेबंद भक्कम करणार असून नव्या तडफेने आपल्या विस्तार महत्त्वाकांक्षांच्या पूर्ततेच्या दिशेने पावले उचलेल, असे कंपनीने प्रसिद्धी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे. ३१ मार्च २०२० अखेर असलेले कंपनीवरील २,७७६ कोटी रुपयांचा कर्जभार यातून काहीसा हलका होऊ शकेल. कंपनीची सध्या जवळपास ३,००० विक्री दालने असून, त्यात पँटालुन्सचाही समावेश आहे.