मुक्त व्यापार म्हणजे सर्वागाने वैध रीतीनेच व्हावा यावर भर देतानाच कर चुकवेगिरीविरुद्धच्या लढय़ासाठी जागतिक स्तरावरील यंत्रणांबरोबरचे सहकार्य देशातील महसुली तपास संस्थांनी वाढविले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे केले.
मुक्त व्यापार हा वैधच असला पाहिजे हे जगावर बिंबविण्यासाठी कर चुकवेगिरीवर नियंत्रण मिळविणारी परिणामकारक पावले आणि कर टाळणाऱ्यांवरील अंकुश आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
अर्थमंत्र्यांच्या हस्ते नवी दिल्लीत दुसऱ्या विभागीय सीमाशुल्क अंमलबजावणी परिषदेचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत भारताशेजारील देशांचा सहभाग आहे.
वित्तीय गैरप्रकार तपासण्यासाठी महसुली तपास यंत्रणांनी तंत्रज्ञानाची कास धरून ते हेरण्याची क्षमताही वृद्धिंगत करावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
जागतिक स्तरावर कर दरांमध्ये कपात, शुल्क रचनेतील बदल, कर सवलतीचे प्रोत्साहन हे कमी होत असल्याचेही त्यांनी या वेळी निदर्शनास आणून दिले. जागतिक स्तरावर असे बदल होत असताना महसुली तपास यंत्रणांनीही आपली भूमिका आणि कार्यात बदल करत त्यानुसार प्रशिक्षित व्हायला हवे, असे आग्रही प्रतिपादन अर्थमंत्र्यांनी केले.
जी२० सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने कर चुकवेगिरीचा मुद्दा ऐरणीवर आणला असल्याचे ते म्हणाले. मुक्त व्यापार आणि उदारीकरणाच्या युगात दोन देशांमध्ये तपास यंत्रणांच्या माहितीचे आदानप्रदान व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.