मध्य तिमाही पत आढाव्याला अवघे दहा दिवस राहिले असताना सध्याचे आर्थिक वातावरण पाहून व्याजदर निश्चितीबाबत निर्णय घ्यावा, असा सावध सल्ला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राजधानीत झालेल्या बैठकीत भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांना दिला. तर व्याजदर कपातीसाठी आणि परिणामी विकासाला चालना देण्यासाठी किंमत स्थिरता आवश्यकता असल्याचे गव्हर्नरांनी निर्दशनास आणून दिले. खाजगी क्षेत्रासाठी जारी करावयाच्या नव्या बँकिंग परवान्याबाबतही गव्हर्नरांनी अर्थमंत्र्यांजवळ यावेळी  चिंता व्यक्त केली. रिझव्‍‌र्ह बँकेचे मध्य तिमाही पतधोरण १९ मार्च रोजी जाहीर होत आहे.
महिला बँकेसाठी समिती नियुक्त
महिलांसाठी असलेली नवी राष्ट्रीयीकृत बँक स्थापन करण्याची तयारी म्हणून तज्ञांची एक समिती स्थापण्यात आली आहे. कॅनरा बँकेचे माजी अध्यक्ष एम. बी. एन. राव हे या समितीचे अध्यक्ष असतील. ही समिती ३० एप्रिलपर्यंत सरकारला एक आराखडा सादर करेल.
भांडवली बाजारातील उभारीला प्राधान्य
भांडवली बाजारातील तेजीला आणि गुंतवणूकदारांच्या संरक्षणाला आपले प्राधान्य असल्याचे अर्थमंत्र्यांनी सेबीबरोबर झालेल्या बैठकी दरम्यान सांगितले. भांडवली बाजार नियामकाचे अध्यक्ष यु. के. सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत अर्थमंत्र्यांनी विशेषत: सुटसुटीत केवायसी प्रक्रियेवर भर दिल्याचे सांगितले जाते.