डॉलरच्या तुलनेत रुपया खूपच घसरल्याने व ती पातळी डालॅरला ६२ रुपये इतकी खाली आल्याने आज अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अर्थखात्याच्या विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. रुपयाची घसरण रोखण्याच्या दृष्टीने त्यात विचारविनिमय करण्यात आला. महसूल, खर्च, आर्थिक सेवा व निर्गुतवणूक या विभागांचे सचिव तीन तास चाललेल्या या बैठकीला उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, अर्थमंत्र्यांनी आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचा आढावा घेतला. रुपया डॉलरच्या तुलनेत ६२.८२ इतका खाली आल्याने शेअर बाजारातही घसरण झाली आहे. आर्थिक कामकाज खात्याची बैठक उद्या होणार आहे. परदेशी चलन या घसरणीमुळे जास्त खर्च होत असून १४ ऑगस्टला रिझर्व बँकेने परदेशात गुंतवणूक करणाऱ्या आस्थापनांना काही बंधने घातली होती. चालू खात्यावरील तूट ७० अब्ज डॉलपर्यंत खाली आणली जाईल जी गेल्या वर्षी ८८.२ अब्ज डॉलर्स होती व परदेशी निधीचा ओघ वाढवण्याचे प्रयत्न केले जातील असे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गेल्या आठवडय़ात सांगितले होते. सोने आ़त वाढल्याने ही तूट वाढली होती त्यामुळे सोने आयातीवर काही र्निबध टाकण्यात आले. सोने, चांदी व प्लॅटिनमवरील सीमाशुल्क वाढवून १० टक्के करण्यात आले होते.