तिसऱ्या टप्प्यातील खासगी एफएम रेडिओ वाहिन्यांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली. या लिलावामुळे सरकारच्या तिजोरीत ५५० कोटी रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने तिसऱ्या टप्प्यातील खासगी एफएम रेडिओ वाहिन्यांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याच्या प्रस्तावाला शुक्रवारी मंजुरी दिली. यामुळे सरकारला ५५० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
खासगी एफएम रेडिओ वाहिन्यांच्या दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात रुपांतरित करण्यासाठी सध्या देशातील ६९ शहरांमध्ये परवानगी दिली आहे. यासाठी सहभागी कंपन्यांना दूरसंचार नियामकाच्या नियमानुसार शुल्क भरावे लागणार आहे.
खासगी एफएम रेडिओ वाहिन्यांचा पहिला टप्पा १९९९-२००० मध्ये पार पडला होता. २००५-०६ मध्ये दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया झाली. या अंतर्गत ८६ शहरांमध्ये २४३ खासगी एफएम रेडिओ वाहिन्या झाल्या.