किशोर बियाणी यांचा फ्युचर समूह ताब्यात घेणाऱ्या रिलायन्सच्या किरकोळ विक्री व्यवसायात अमेरिकी वित्तसंस्था सिल्व्हर लेक पार्टनर्सन रस दाखवला आहे. रिलायन्स रिटेलमधील १.७५ टक्के  हिस्सा ७,५०० कोटी रुपये मोजून तिने खरेदी केला आहे.

करोना-टाळेबंदी दरम्यान फेसबुक, गूगल, मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून रिलायन्स जिओमध्ये विदेशी गुंतवणूक खेचून आणणाऱ्या रिलायन्स समूहाने तिच्या किरकोळ विक्री व्यवसायात लक्षणीय वेग घेतला आहे. गेल्याच महिन्यात फ्युचर समूहातील उपकं पन्यांसह किराणा साखळी व्यवसाय रिलायन्स रिटेलने खरेदी केला आहे.

वर्षांच्या सुरुवातीलाच अमेरिकी वित्तसंस्थेने  जिओ प्लॅटफॉम्र्समध्ये १.३५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. जिओमध्ये पहिली गुंतवणूक करणारी हीच अमेरिकी कंपनी होती. सिल्व्हर लेक पार्टनर्सने दोन टप्प्यात २.०८ टक्के  हिस्सा खरेदीद्वारे १०,२०२.५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

रिलायन्स रिटेलमार्फत रिलायन्स फ्रेश, ट्रेंड्स, जिओमार्ट, डिजिटल आदी विविध १२,००० दालने देशातील ७ हजार शहरांमध्ये चालवली जातात.

समभागाची ३ टक्के  मूल्यझेप

सलग दुसऱ्या व्यवहारात घसरण नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागमूल्य बुधवारी २.८५ टक्के झेपावले आणि हा समभाग २,१६१.२५ रुपयांवर स्थिरावला. कंपनीचे बाजार भांडवल १३.७० लाख कोटी रुपयांवर पोहोचले.