करोना साथ प्रसार नियंत्रणासाठी लागू करण्यात येत असलेल्या टाळेबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा विस्कळीत झाला असून येत्या काही दिवसांमध्ये अन्नधान्याच्या वस्तूंसह पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनाच्या किमतीही वाढतील, अशी भीती रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

करोनाबाधितांची संख्या तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने महाराष्ट्रातही टाळेबंदीचा विस्तार करण्याची तयारी सरकार पातळीवर सुरू आहे. येत्या शुक्रवारी राज्यात संपुष्टात येणारी टाळेबंदी आणखी पंधरवड्यासाठी लागू करण्याचे सूतोवाच मंत्र्यांकडून केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या संशोधन अहवालात टाळेबंदीच्या विपरीत परिणामांबाबत इशारा देण्यात आला आहे.

‘अर्थव्यवस्थेची विद्यमान स्थिती’ या शीर्षकासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात, टाळेबंदीमुळे अन्नधान्य, इंधने तसेच अन्य जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विविध जिनसांचा पुरवठा विस्कळीत झाल्यास नजीकच्या दिवसांमध्ये महागाई वाढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

देशाच्या काही भागांत अंशत: किंवा संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाल्याचा परिणाम वेगवेगळ्या गोष्टींच्या पुरवठ्यावर यापूर्वीही झाला आहे. महागाईत सहनशील मर्यादेपेक्षा वाढ झाल्यास महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर उपाययोजना गरजेची आहे. एप्रिल, मे आणि जूनमध्ये महागाईचा कल लक्षात घेऊन प्रसंगी महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर उपायांची गरज भासू शकेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

मागील वर्षी टाळेबंदीच्या कठोर निर्बंधांमुळे एप्रिल व मेममध्ये प्रत्यक्ष आधारभूत किमतींचे संकलन झाले नव्हते. त्यामुळे महागाईतील नेमकी वार्षिक वाढ निश्चिात करण्यावर मर्यादा लक्षात घेऊन अपारंपरिक उपायांची योजना कल्पकतेने राबवणे आवश्यक आहे. महागाई वाढीचे मळभ, सामान्य पर्जन्यमानाचा अंदाज आणि कच्च्या तेलाच्या किमतीत शिथिलतेची या रुपेरी कडा असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बाधितांचे समोर येणारे आकडे धडकी भरविणारे आहेत. केंद्र सरकारचे १८ पुढील सर्वच वयोगटांतील नागरिकांना लस उपलब्ध करून दिली आहे. सरकारच्या या सार्वत्रिक लसीकरणाच्या निर्णयाचा जनजीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता संभवत आहे, असे या अहवालात मतप्रदर्शन केले आहे.

वाढती महागाईमुळे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या पतधोरणात प्रमुख व्याजदर स्थिर ठेवले होते. तूर्त महागाई दर सहनशील अशा ४ टक्क््यांपुढे आहे.

टाळेबंदीमुळे अन्नधान्य, इंधन, अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. जिनसांचा पुरवठा विस्कळीत झाल्यास नजीकच्या कालावधीत महागाई वाढण्याची शक्यता आहे.

– शक्तिकांत दास,  गव्हर्नर, रिझर्व्ह बँक.