गेल्या काही वर्षांत वेगाने वाढत असलेल्या सेवाक्षेत्रातील अविभाज्य भाग असलेल्या खाद्यान्न व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना एकाच व्यासपीठावर घेऊन येणाऱ्या ‘फूड हॉस्पिटॅलिटी वर्ल्ड’ या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले. हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष (पश्चिम) भरत मलकानी, इंडियन एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गीस, हॅनोवर मिलानो फेअर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल शाह, मुंबईतील इटलीचे वाणिज्यदूत डॉ. युगो सिआलाटानी, इटलीमधील लोम्बार्डिया प्रांताचे कृषीमंत्री गिआनी फावा आणि कॅलाब्रियाचे कृषीमंत्री मायकेल ट्रीमाटेरा हेदेखील यावेळी उपस्थित होते. हॅनोवर मिलानो फेअर एक्स्प्रेस आणि इंडियन एक्स्प्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ग्लोबल फेअर्स अ‍ॅण्ड मीडियाकडून हे प्रदर्शन आयोजिण्यात आले आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात २५ जानेवारीपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात ३०० हून अधिक दालने सुसज्ज झाली असून ११ देशातील ५०हून अधिक ब्रॅण्ड्सचा यात सहभाग आहे.
गेल्या पन्नास वर्षांत सेवाक्षेत्रांचा एकूण उद्योगातील वाटा ४६ टक्क्य़ांवरून ६० टक्क्य़ांवर गेला आहे. आदरातिथ्य सेवेतही वेगाने प्रगती होती आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील ब्रॅण्ड्सची माहिती, नवीन उत्पादनांचे अनावरण, आघाडीच्या विक्री व्यवस्थापकांशी ओळख होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे अनिल देशमुख म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकाधिक ब्रॅण्ड सहभागी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसाठी ही चांगली संधी आहे, असेही त्यांनी सांगितले. खाद्यान्न व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात गेल्या काही वर्षांत होत असलेल्या बदलांचा तसेच वर्षांनुवर्षे लोकप्रिय ठरलेली पारंपरिक उत्पादने यांचा मेळ या प्रदर्शनामध्ये आहे. त्यामुळे कोळशाच्या पारंपरिक तंदूर भट्टीसह वीजेवर चालणारी भट्टी, मोठय़ा किचनसाठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या भांडय़ासह स्टीलच्या कढया, कोळसा, एलपीजी आणि विजेवर चालणाऱ्या शेगडय़ा अशा विविधांगी उत्पादनांसोबतच स्वयंपाकघरे स्वच्छ ठेवण्यासाठी क्लिनिंग उपकरणेही या प्रदर्शनात आहेत. हॉटेलसाठी लागणारे फर्निचर, दिवे, वीजेची नवीन यंत्रणा यांचेही ब्रॅण्डही आहेत. खाद्य तसेच आदरातिथ्य क्षेत्रातील काही विषयांवर दोन दिवसांमध्ये होणारी चर्चासत्रेही विचारप्रवृत्त करणारी ठरतील, असे जॉर्ज वर्गीस म्हणाले. या प्रदर्शनात ५० टक्क्य़ाहून अधिक सहभाग बाजारपेठेत नावलौकीक  आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे, त्यामुळे हे प्रदर्शन महत्त्वाचे ठरते, असे शाह म्हणाले. इटलीमध्ये खाद्यपदार्थ हा महत्त्वाचा उद्योग आहे. इटलीतील हे खाद्यपदार्थ भारतीय बाजारपेठेतही आम्ही उत्सुक आहोत व त्यासाठी भारतीय सरकारकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे सिआलाटानी म्हणाले. तीन दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ‘द ग्रेट इंडियन कलिनरी चॅलेंज’मध्ये देशातील नामवंत हॉटेलमधील १०० नामवंत शेफ सहभागी झाले आहेत. यासोबतच हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादही आयोजित करण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या आयोजनात अ‍ॅपीडा, ऑल इंडिया वाइन प्रोडय़ूसर्स असोसिएशन, हॉस्पिटॅलिटी पर्चेसिंग मॅनेजर्स फोरम, फूड ब्लॉगर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनांचे सहकार्य लाभले आहे.