किरकोळकिंमत निर्देशांकात किंचित घट; घाऊक निर्देशांक ०.१६ टक्क्यांवर

घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांक चार महिन्यांनंतर ऑगस्टमध्ये सकारात्मक पातळीवर म्हणजे ०.१६ टक्के पातळीवर गेले असले, तरी बाजारातील मागणी-पुरवठय़ाच्या विस्कटलेल्या घडीचा त्यावर स्पष्टपणे प्रभाव दिसून येतो. तर दुसरीकडे किरकोळ किमतीवर महागाई निर्देशांक आधीच्या महिन्यांच्या तुलनेत नरमला असला तरी मुख्यत: अन्नधान्याच्या किमतीतील भडक्याच्या परिणामी तो ऑगस्टमध्ये ६.६९ टक्के अशा चिंताजनक पातळीवर असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराची आकडेवारी सोमवारी सरकारकडून जाहीर करण्यात आली. आधीच्या चार महिन्यांच्या तुलनेत किरकोळ महागाईचा पारा काहीसा ओसरला असल्याचे या आकडेवारीने स्पष्ट केले. मात्र तरी अन्नधान्याच्या किमतीतील चढा सूर ही मोठी चिंतेची गोष्ट बनून गेली आहे.

दुसरीकडे घाऊक किंमत निर्देशांकावर महागाई दर आधीच्या चार महिन्यांतील उणे पातळीवरून सुधारून ऑगस्टमध्ये सकारात्मक ०.१६ टक्के पातळीवर आला आहे. उत्पादित वस्तूंना मागणी आल्याचे हे द्योतक मानले जाते. तथापि, वस्तू निर्मात्यांनी बाजारातील किमतींवर प्रभाव टाकण्याची शक्ती पुरती कमावलेली नसून, पुरवठय़ाच्या तुलनेत मागणीला उठाव नसल्याचेही सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. करोना टाळेबंदीमुळे बाजारपेठाच ठप्प आणि मागणी थंडावल्याचे आधीच्या महिन्यातील घाऊक महागाई दराच्या आकडय़ाने सुस्पष्ट संकेत दिला आहे. एप्रिलमध्ये उणे १.५७ टक्के, मेमध्ये उणे ३.३७ टक्के, जूनमध्ये उणे १.८१ टक्के आणि जुलैमध्ये उणे ०.५८ टक्के असे सलग चार महिने घाऊक महागाई दर नकारार्थी राहिला आहे.

व्याजाचे दर निर्धारित करण्यास रिझव्‍‌र्ह बँकेकडून लक्षात घेतल्या जाणाऱ्या किरकोळ किमतीवर आधारित महागाई निर्देशांकाची तऱ्हा अगदी उलट आहे. जीवनावश्यक अन्नधान्य तसेच फळे व भाज्या यांच्या किमतीतील भडक्यामुळे हा निर्देशांक सलग काही महिने चिंताजनक पातळीवर आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेसाठी हा दर ४ टक्के (कमी-अधिक २ टक्के) पातळीवर राहणे समाधानाचे मानले जाते, किंबहुना सरकारने मध्यवर्ती बँकेला दिलेली वैधानिक जबाबदारी आहे. मात्र तो निरंतर ६ टक्क्यांच्या पातळीवर नोंदला गेल्याने, रिझव्‍‌र्ह बँकेला अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी आवश्यक असलेल्या व्याज दर कपातीसारखा उपाय हाती घेण्यापासून परावृत्त करणारे ठरेल, असा विश्लेषकांचा होरा आहे.