चेन्नई : भांडवली बाजारातील सूचिबद्ध व आघाडीची बहुपडदा सिनेमा प्रदर्शनकर्ती पीव्हीआर लिमिटेडने दक्षिणेतील एसपीआय सिनेमाज खरेदी केली आहे. कंपनीतील ७१.६९ टक्के हिस्सा खरेदी करताना पीव्हीआरने एसपीआय सिनेमाजच्या खाद्य पुरवठा सुविधा मात्र व्यवहाराबाहेर ठेवली आहे.

हा व्यवहार ८५० कोटी रुपयांचा झाला असल्याचे कळते. एसपीआय सिनेमाजचे किरण रेड्डी आणि स्वरूप रेड्डी हे कंपनीचे अनुक्रमे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष म्हणून तूर्त कायम राहणार आहेत.

एसपीआय सिनेमाज पूर्वी सत्यम सिनेमाज म्हणून ओळखली जात असे.

कंपनीच्या सिने दालनात सत्यम पॉपकॉर्न ही नाममुद्रा विशेष लोकप्रिय होती. त्याचबरोबर एस्केप, पालाझो, द सिनेमा, एस२ सिनेमा आदीही नाममुद्रा कंपनीच्या अखत्यारित आहेत. एसपीआय सिनेमाज दक्षिण भारतातील अव्वल सिनेगृह साखळी असलेली कंपनी आहे. तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका आणि केरळ राज्यांमध्ये कंपनीच्या ३१९.६३ कोटी रुपयांच्या मालमत्ता आहेत. कंपनीच्या एकूण १७ मालमत्तांमध्ये ७६  हून अधिक सिनेपडदे आहेत. कंपनीचे अस्तित्व निवडक १० शहरांमध्ये आहे.

एसपीआय सिनेमाच्या अधिग्रहणानंतर पीव्हीआरच्या एकूण सिने पडद्यांची संख्या ७०६ वर गेली आहे. यामुळे कंपनीही दक्षिणेत क्रमांक एकची बनली आहे.