देशातील श्रीमंतांची क्रमवारी जाहीर करणाऱ्या ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांना पहिल्या स्थानावर कायम ठेवले आहे. २.६ अब्ज वाढीव संपत्तीसह अंबानी सलग आठव्या वर्षी श्रीमंतांच्या यादीत अव्वल राहिले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता २३.६ अब्ज डॉलरची मोजली गेली आहे.
अंबानींपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर १८ अब्ज डॉलरसह दिलीप संघवी आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत ४.१ अब्ज डॉलर अधिक संपत्ती राखत त्यांनी या स्थानावरून लक्ष्मीनिवास मित्तल यांना बाजूला केले आहे. अर्सेलर मित्तलचे मित्तल १५.८ अब्ज मालमत्तेसह यंदा पाचव्या क्रमांकावर राहिले आहेत. विप्रोचे अझीम प्रेमजी यांचा क्रम यंदा एकाने उंचावला आहे. गेल्या वर्षीच्या १३.८ अब्ज डॉलरची संपत्ती व चौथे स्थान यांच्या तुलनेत यंदा ते १६.४ अब्ज डॉलर मालमत्तेसह ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. टाटा समूहातील सर्वात मोठय़ा भागीदार शापूरजी पालनजी समूहाचे पालनजी मिस्त्री हे १५.९ अब्ज डॉलरसह यंदा चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील अदानी समूहाचे गौदम अदानी या यादीत एकदम ११ क्रमांकांनी उंचावत ११ व्या स्थानावर पोहोचले आहेत. त्यांची संपत्तीही ४.५ अब्ज डॉलरवरून यंदा जवळपास दुप्पट ७.१ अब्ज डॉलर झाली आहे.
जानेवारीपासून २८ टक्के वाढ राखणाऱ्या भांडवली बाजारपेठेत समूहाच्या वधारत्या समभाग मूल्यानेही अदानींच्या वाढत्या संपत्तीत सिंहाचा वाटा राखल्याचे खुद्द ‘फोर्ब्स’ने नमूद केले आहे.
अब्जाधीशांच्या पहिल्या १० स्थानांमध्ये हिंदुजा बंधू, शिव नाडर, गोदरेज कुटुंब, कुमार मंगलम बिर्ला, सुनील मित्तल यांचा समावेश आहे. हर्ष गोयंका, संजीव गोयंका यांनी या यादीत प्रथमच स्थान मिळविले आहे.
विजय मल्ल्या यादी बाहेर
बँकांकडून कर्जबुडव्याचा शिक्का बसलेले यूबी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या ‘फोर्ब्स’च्या १०० जणांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. गेल्या वर्षी ते ८४ व्या स्थानावर होते. त्या वेळी त्यांची मालमत्ता ८० कोटी डॉलर होती. बँकांकडून कर्जबुडव्याचा शिक्का बसलेले यूबी समूहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या ‘फोर्ब्स’च्या १०० जणांच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. गेल्या वर्षी ते ८४ व्या स्थानावर होते. त्या वेळी त्यांची मालमत्ता ८० कोटी डॉलर होती.