भारतातील वाहन उद्योगातून गाशा गुंडाळणाऱ्या फोर्ड या आघाडीच्या अमेरिकन वाहन उत्पादक समूहाने तब्बल ७,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे पाऊल उचलले आहे.

समूह पुनर्बाधणीची बहुप्रतिक्षित घोषणा करताना फोर्डने आगामी कालावधीत विजेवर धावणाऱ्या वाहनांची निर्मिती करण्याचे जाहीर केले. मात्र असे करताना समूहाच्या जगभरातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी १० टक्के कर्मचाऱ्यांनी कमी केले जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

वर्षभरापासून व्यवसाय पुनर्बाधणी करण्याचे धोरण आखणाऱ्या फोर्डने वर्षांला ६० कोटी डॉलर वाचविण्याचे लक्ष्य राखले होते. त्याचाच एक भाग म्हणून कर्मचारी कपातीची प्रक्रिया २४ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अमेरिकेत कंपनीच्या २,३०० कर्मचाऱ्यांचे रोजगार कमी करण्यात येणार असून १,५०० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. चालू आठवडय़ापासून ५०० कर्मचारी कमी होणार आहेत.