‘‘पाऊस ही सध्याची सर्वात मोठी अनिश्चितता आहे,’’ असे म्हणत पावसाबाबतची प्रारंभिक भाकिते फारशी उत्साहदायी नाहीत, याची गव्हर्नर राजन यांनी दखल घेतली. वस्तुत: रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणानंतर गव्हर्नर राजन यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच, ‘सरासरीपेक्षा कमी’वरून ‘तुटी’च्या पावसाबाबत दुष्काळसदृश सुधारित भाकीत यंदाच्या हंगामाबाबत हवामान खात्याकडून वर्तविण्यात आले. गतकाळातही अल् निनो सावटामुळे तुटीचा वा जवळपास सरासरीइतका पाऊस झाला आहे, पण त्यातून कृषी उत्पादनात घटीचा परिणाम दिसून आलेला नाही. शिवाय कृषी उत्पादनांत घटल्याने अन्नधान्याच्या किमती वाढल्याचा परिणाम झाला, असेही दिसलेले नाही. त्यामुळे पुढे नक्की घटनाक्रम काय असेल, हे खूपच अनिश्चित आहे. काय घडू शकते याचा नेमका पूर्वअंदाज आणि सरकारच्या त्या दृष्टीने कृती ही खूपच महत्त्वाची ठरेल, असे राजन यांनी सूचित केले. २००२-०३ सालात पावसाने ओढ घेतली परंतु सरकारच्या कृतिशीलतेमुळे महागाई वाढीचा त्यातून अत्यल्प परिणाम दिसून आला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जसे उद्योगक्षेत्राकडून भासविले जात आहे त्या तुलनेत अर्थव्यवस्थेतील उभारी आजही खूप धिमी आहे, अशी त्यांनी पुस्ती जोडली.