भारतीय बनावटीच्या मारुती सुझुकी कंपनीबरोबरच विदेशी वाहन उत्पादक कंपन्यांनीही नव्या वर्षांपासून किंमत वाढविण्याच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. निस्सान, रेनो तसेच जर्मनीतील फोक्सव्ॉगन समूहातील स्कोडाने सोमवारी ५० हजार रुपयेपर्यंतची किंमत वाढ जाहीर केली.
जानेवारी २०१६ च्या पहिल्या आठवडय़ापासूनच कंपन्यांच्या वाहनांच्या किंमती ३ टक्क्य़ांपर्यंत वाढवित असल्याचे सोमवारी जाहीर करण्यात आले. खर्चातील वाढता भार पेलण्याच्या स्थितीत नसल्याने किंमतवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकण्यावाचून पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण याबाबत कंपन्यांनी दिले आहे.
यानुसार जपानी निस्सानच्या भारतातील मायक्रा या लहान गटातील वाहनांपासून टेरेनो या एसयूव्ही गटातील वाहने महाग होणार आहेत. त्यांच्या किंमती सध्या ४.४७ ते १२.९१ लाख रुपये दरम्यान आहेत. निस्सान समूहातीलच डॅटसन, डॅटसन गो तसेच डॅटसन गो प्लसच्याही किंमती वाढणार आहेत. फ्रान्सच्या रेनोनेही येत्या महिन्यापासून तिच्या वाहनांच्या किंमती ३ टक्क्य़ांपर्यंत वाढविण्याचे जाहीर केले आहे. कंपनी क्विड, पल्स, स्काला, डस्टर, लॉजी, फ्लुएन्स, कोलिओस आदी २.५६ ते २३.४७ लाख रुपये दरम्यानच्या हॅचबॅक ते एसयूव्ही प्रकारच्या कार भारतात विकते. स्कोडा ऑटो इंडियानेही २ ते ३ टक्क्य़ांपर्यंत, ५० हजार रुपयांपर्यंत किंमत वाढ करण्याचेही जाहीर केले आहे. कंपनीच्या रॅपिड, ऑक्टेव्हिआ, येती, सुपर्ब आदी चार प्रकारातील वाहने ही ७.५५ ते २६.८३ लाख रुपये दरम्यान आहेत.
गेल्याच आठवडय़ात भारतातील मारुती सुझुकीने २० हजार रुपयेपर्यंतची किंमत वाढ जाहीर केली होती. तर स्पर्धक ह्य़ुंदाईनेही ३० हजार रुपयांपर्यंत तिच्या वाहनांच्या किंमती वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. परकी चलन व्यासपीठावर गेल्या काही सत्रांपासून होत असलेल्या मोठय़ा फेर बदलामुळे सर्वप्रथम जर्मनीच्या मर्सिडिज बेन्झने किंमत वाढ घोषित केली होती. बीएमडब्ल्यू, टोयोटा आदी आलिशान कारच्या स्पर्धक कंपन्याही वाहन दरवाढ करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आता जवळपास सर्वच वाहन कंपन्या १ जानेवारी २०१६ पासून त्यांच्या विविध वाहनांचे दर वाढविणार आहेत.