केंद्रीय अर्थ व्यवहार सचिवांचा विश्वास

देशात विदेशी गुंतवणूक वाढीसाठी विदेशातील दौऱ्यांमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांद्वारे भर देण्यात आल्यानंतर यासाठी अधिक ठोस धोरण आखतानाच थेट विदेशी गुंतवणुकीतील अडथळे दूर सारले जातील, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून बुधवारी देण्यात आला.
केंद्रीय अर्थ व्यवहार सचिव शशिकांता दास यांनी ‘असोचेम’द्वारा आयोजित येथील एका कार्यक्रमात सांगितले की, कंपन्यांना विदेशी निधी उभारणी (ईसीबी) सुलभ होण्याबाबतचा कृती आराखडा रिझव्‍‌र्ह बँक लवकरच सादर करेल. अनेक क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढविण्याचेही त्यांनी यावेळी सुतोवाच केले. भारतातील थेट विदेशी गुंतवणुकीचे धोरण केंद्र सरकार अधिक प्रोत्साहनात्मक करण्याच्या तयारीत असून भारत हा गुंतवणूकप्रधान देश व्हावा, या दिशेने पावले पडत असल्याचे दास यांनी सांगितले. येथील कंपन्यांना विदेशी निधी उभारणी सुलभ होण्याबाबत रिझव्‍‌र्ह बँकेबरोबर चर्चा करण्यात आली असून लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
विदेशी निधी उभारणी सुलभ केल्याबाबतचा आराखडा सादर झाल्यानंतर त्यावर मागविलेल्या मतानंतर प्रत्यक्षात नियमावली येण्याची शक्यता आहे.विदेशी निधी उभारणीमुळे पतधोरण स्थिरता अपेक्षित असून देशाच्या एकूण विदेशी कर्ज तसेच भविष्यातील देय रकमेबाबतची भूमिकाही स्पष्ट होईल.