एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी चर्चेत असलेल्या फायनान्शियल टेक्नॉलॉजीज या प्रवर्तक कंपनीचा शेअर व्यवहार मंच ‘एमसीएक्स- एसएक्स’चे जनहित संचालक म्हणून माजी गृहसचिव गोपाल कृष्ण पिल्लई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात देशातील तिसरा राष्ट्रीय शेअर बाजार असलेल्या एमसीएक्स-एसएक्सच्या परवान्याचे नूतनीकरण करताना, भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने कारभार सशक्ततेची घातलेल्या पूर्वअटीनुसार संचालक मंडळावर झालेली ही दुसरी नियुक्ती आहे. या आधी अलीकडेच ‘सेबी’ने जनहित संचालक म्हणून आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचे माजी प्रमुख थॉमस मॅथ्यू यांची एमसीएक्स-एसएक्सवर नियुक्ती केली आहे. त्या उलट  एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जिग्नेश शाह, जोसेफ मॅसी यांना  संचालक मंडळावरून पायउतार व्हावे लागले आहे.
दरम्यान एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने या बाजारमंचाचे प्रवर्तक आणि संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभागाकडून तसेच वायदे बाजार नियंत्रक ‘एफएमसी’ यांचीही या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी सुरू आहे.