मूळच्या ब्रिटनच्या स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारीपदी झरिन दारूवाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ज्या आयसीआयसीआय बँकेतील घाऊक बँक विभागाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार पाहत होत्या तो आता आयसीआयसीआय समूहातीलच विशाखा मुळ्ये या मराठी महिला अधिकाऱ्यांकडे येणार असल्याचे समजते.
महिलाच नेतृत्व करत असलेल्या आयसीआयसीआय समूहात महिलांमधील रस्सीखेच पुन्हा एकदा प्रकर्षांने समोर आली आहे. आयसीआयसीआय व्हेंचर फंड्स मॅनेजमेंट कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्याधिकारी विशाखा मुळ्ये यांना सोमवारीच बँकेच्या संचालक मंडळावर घेण्यात आले. काही वर्षांपूर्वी बँक समूहातील शिखा शर्मा या बाहेर पडत अ‍ॅक्सिस बँकेत रुजू झाल्या होत्या. स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेच्या भारतात १०० हून अधिक शाखा असून ती देशातील सर्वात मोठी खासगी विदेशी बँक आहे. बिकट आर्थिक स्थितीत असलेल्या बँकेच्या संघरचनेत फेरबदल सुरू आहेत. यानुसार झरिन यांच्या आधी भारतीय व्यवसायाची जबाबदारी पाहात असलेले सुनील कौशल यांना आफ्रिका विभागाचे मुख्य म्हणून बढती देण्यात आली आहे.