*  वरियमसिंह, वाधवान पिता-पुत्रांना कोठडी * तिघांना ताब्यात घेण्यासाठी ‘ईडी’चा अर्ज

मुंबई : आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटीव्ह बँकेचे (पीएमसी) माजी संचालक सुरजितसिंह अरोरा यांना अटक केली. कर्ज प्रस्तावाला मंजुरी देणाऱ्या समितीत अरोरा यांचा समावेश होता. बँक कर्ज घोटाळ्यातील ही पाचवी अटक आहे. संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या अन्य संचालकांना देश सोडणे शक्य होऊ नये, या उद्देशाने ‘लूक आऊट’ नोटीस जारी केल्याचे आर्थिक गुन्हे विभागाकडून सांगण्यात आले.

घोटाळ्याप्रकरणी यापूर्वी अटक केलेल्या माजी अध्यक्ष वरियम सिंह, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचे चिरंजीव सारंग यांना आर्थिक गुन्हे विभागाने बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) या तिघांना ताब्यात देण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात सादर केला. ईडीनेही कर्ज घोटाळयाची दखल घेत स्वतंत्रपणे तपास सुरू केला आहे.

वरियम सिंह, वाधवान पिता-पुत्राला जामीन देऊ नये, या मागणीसाठी बँकेच्या खातेदारांनी न्यायालयाबाहेर गर्दी केली होती. तत्पूर्वी न्यायालयाबाहेर जमलेल्या खातेदारांनी ‘आरबीआयने तीन सामान्यांचा बळी घेतला’ अशा आशयाचे फलक झळकावले. बँकेसह रिझव्‍‌र्ह बँकेचा निषेध नोंदवला. दगावलेल्या संजय गुलाटी, फत्तेमुल पंजाबी, डॉ. निवेदिता बजलानी या पीएमसी बँक खातेदारांना उपस्थित जमावाने आदरांजली वाहिली.

जमावाने पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट घेत पारदर्शक तपासाची मागणी केली. जमावाच्या प्रश्नांना उत्तर देताना कर्ज घोटाळ्यात सहभागी प्रत्येक आरोपीविरोधात कारवाई केली जाईल, असे बर्वे यांनी स्पष्ट केले. कर्ज व्यवहार दडपण्यासाठी हजारो सर्वसामान्य कर्ज खाती आरोपी बँक पदाधिकाऱ्यांनी सुरू ठेवली. मात्र ही बाब बँकेचा ठोकताळा तपासणाऱ्या लेखापालांना, नियंत्रण ठेवणाऱ्या संबंधीत यंत्रणांना का दिसू शकली नाही, याचाही तपास केला जाईल, असे बर्वे यांनी सांगितले.

‘जप्त मालमत्ता विकून ‘पीएमसी’ची कर्जमुद्दल फेडा’

बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएल कंपनीची जप्त केलेली मालमत्ता विका आणि बँकेकडून घेतलेल्या कर्जाची मुद्दल रक्कम फेडा, अशी विनंती करणारा अर्ज एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान यांनी आपल्या वकीलातर्फे आर्थिक गुन्हे विभाग आणि ईडीकडे सादर केला. सद्यपरिस्थितीत जनहितार्थ ही भूमिका घेतली असून मालमत्तांच्या विक्रीला आपली परवानगी आहे, असे या अर्जात वाधवान यांनी नमूद केले आहे.