मुंबई : प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर सुबीर विठ्ठल गोकर्ण यांचे मंगळवारी वॉिशग्टन डीसी येथे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. केंद्रीय अर्थ मंत्रालय, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

नोव्हेंबर २०१५ मध्ये गोकर्ण यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवर कार्यकारी संचालक आणि भारताचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली होती. त्याआधी नोव्हेंबर २००९ ते डिसेंबर २०१२ दरम्यान ते रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत होते. ते त्या वेळी सर्वात कमी वयात नेमणूक झालेले डेप्युटी गव्हर्नर होते. त्यांच्या मागे त्यांची पत्नी ज्योत्स्ना बापट आणि कन्या कणक  गोकर्ण असा परिवार आहे.

दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांनी अर्थशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली होती. केस वेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून त्यांनी अर्थशास्त्रात स्नातकोत्तर पदवी मिळविली होती. रिझव्‍‌र्ह बँकेत दाखल होण्याआधी ते क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कार्यकारी संचालक होते. स्टँडर्ड अँड पुअर्स, एनसीएईआर तसेच इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत त्यांनी व्याख्याता म्हणून काम केले होते.

लेहमन ब्रदर्समधील संकटापासून सुरुवात, २००९ सालात जागतिक वित्तीय अरिष्टाच्या रूपात झाली, अशा आव्हानात्मक काळात गोकर्ण रिझव्‍‌र्ह बँकेवर नियुक्त होऊन आले होते. त्यांच्या कार्यकाळात रेपो दर ४.७५ टक्क्य़ांवरून सार्वकालिक उच्चांकी ८.७५ टक्क्य़ांपर्यंत वाढविला गेला. त्याचवेळी घाऊक महागाई दर ०.५ टक्क्य़ांवरून चिंताजनक अशा ९ टक्क्य़ांपर्यंत वाढत गेला होता.