भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना ५००० आणि १०००० रुपयांची नोट चलनात आणायची होती, अशी माहिती समोर आली आहे. तशी शिफारस त्यांनी नरेंद्र मोदी सरकारकडे केली होती.

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्त झाले होते. त्यांनी ५००० आणि १०००० रुपयांची नोट चलनात आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. वाढत्या महागाईमुळे १००० रुपयांचे मूल्य कमी झाल्याचे सांगत अधिक मूल्याच्या ५००० आणि १०००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याबाबत मोदींच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारला सूचविले होते. आरबीआयतर्फे लोक लेखा समितीला देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. आरबीआयने ऑक्टोबर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सरकारला हा सल्ला दिला होता, असे सांगितले जात आहे.

रघुराम राजन यांनी ५००० आणि १०००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा सल्ला दिल्यानंतर केंद्र सरकारने २००० रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्याच्या तयारीत असल्याचे आरबीआयला मे २०१६ मध्ये सांगितले होते. जूनमध्ये या नोटांची छपाई करण्याचे निर्देश छपाई कारखान्यांना देण्यात आले होते. त्यामुळे आरबीआय आणि सरकारमध्ये ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी कोणती आणि कोणत्या पातळीवर चर्चा सुरू होती, हे आरबीआयने दिलेल्या या माहितीने समोर आले आहे. मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.

आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलेली शिफारस सरकारने फेटाळली होती. त्याऐवजी पर्यायी चलन लवकरात लवकर बाजारात आणण्याचा विचार केंद्र सरकारचा होता, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. पर्यायी चलन म्हणून २००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला, असेही जेटली यांनी सांगितले. दरम्यान, केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये नव्याने चलनात आलेल्या २००० रुपयांच्या नोटेचे सुट्टे मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यात राजन यांच्या सल्ल्यानुसार ५००० आणि १०००० रुपयांची नवी नोट चलनात आणली गेली असती तर, देशातील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले असते, असेही जेटली यांनी सांगितले.